नागपूर : संपूर्ण राज्यात मोटरसायकलस्वारांना ‘हेल्मेट’सक्ती असताना शहरात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसून येते. ‘हेल्मेट’ न घालणाऱ्यांविरुद्ध वाहतूक विभागाकडून ठोस कारवाई होत नाही. माहितीच्या अधिकारातूनच ही बाब समोर आली आहे. या वर्षी जवळपास ११ महिन्यांत केवळ ५४८ वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे यातील ३० टक्के वाहनचालक हे पोलीस कर्मचारीच होते. जर शहरातील पोलीसच कायदा पाळत नसतील तर जनतेवर वचक कसा राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी शहरात ‘हेल्मेट’सक्ती आहे का, किती वाहनचालकांवर कारवाई झाली, सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या व त्यांच्याकडून वसूल करण्यात आलेला दंड यासंदर्भात विचारणा केली होती. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन ‘हेल्मेट’ न वापरणाऱ्यांवर हवी तशी कारवाई होत नसल्याचे समोर आले आहे. या वर्षी १ जानेवारी ते २५ आॅक्टोबर या कालावधीत ५४८ दुचाकीस्वारांवर गुन्हे दाखल करण्यात आले व त्यांच्याकडून ५४ हजार ८०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. कारवाई झालेल्यांमध्ये १६६ म्हणजेच सुमारे ३० टक्के दुचाकीस्वार हे पोलीस कर्मचारीच होते. त्यांच्याकडून दंडापोटी १६ हजार ७०० रुपये वसूल करण्यात आले. २०११ साली ७६९. २०१२ साली ६७३ आणि २०१३ साली ६६ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
‘हेल्मेट’ न घालणाऱ्यांचे काय?
By admin | Published: November 29, 2014 2:57 AM