प्रवीण खापरे, संजय लचुरिया।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तब्बल अडीच-तीन महिन्यांच्या टाळेबंदीनंतर सरकारने बाजारातील व्यवहारात शिथिलता प्रदान केली आणि हातावर पोट असणाऱ्यांसह व्यापारी वर्गाने सुटकेचा श्वास सोडला होता. मात्र, मनपा आयुक्त आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून पुन्हा एकदा टाळेबंदी लागण्याचे संकेत प्राप्त होताच संपूर्ण बाजारात धास्तीचे वातावरण पसरले आहे. तीन महिन्यात संपूर्ण अर्थव्यवस्था मोडकळीस आल्यानंतर कसेतरी पोट भरण्याचे प्रयत्न करणाऱ्या वर्गाकडून... ‘आता आम्ही जगायचे कसे?’ असा भयप्रद सवाल उपस्थित केला जात आहे.
मेकॅनिकला गाडी थांबण्याची भीतीसंक्रमण वाढते आहे आणि सरकारकडून जो निर्णय घेतला जाईल, तो मान्य करणेच योग्य ठरेल. मात्र, तीन महिन्याचा काळ आठवला की अजूनही अंगावर काटा उभा राहतो. गाड्या पुन्हा थांबतील आणि माझ्यासारख्या मेकॅनिकला पुन्हा अडचणीत जगावे लागेल, अशी भावना अतुल मेकॅनिकने व्यक्त केली.
दुसरा पर्याय नाही का?रोज कमावतो तेव्हा घराचा रहाटगाडा चालतो. काम नसेल तर कुटुंबाची अवस्था काय असते, याचा अनुभव गेल्या तीन महिन्यात घेतला आहे. आता पुन्हा टाळेबंदी लागली तर काय होईल, याची भीती आहे. टाळेबंदीपेक्षा संसर्ग रोखण्यासाठी दुसरा पर्याय नाही का, असा सवाल इतवारी भागात काम करणारे नरेश मोचीवाला यांनी उपस्थित केला.
उपाशीच मरावे लागेलडे टू डे पुढे भुट्टा विकणाऱ्या भुट्टावाला यांना रोजगाराची चिंता आहे. वातावरणानुसार हंगामी व्यवसाय निवडणाऱ्यात येणारे हे भुट्टेवाले आधीच विक्री होत नसल्याने चिंतेत आहेत. पावसाळा पूर्ण असाच चालला आणि पुन्हा टाळेबंदी असेल तर मरणयातना भोगण्यासारखीच स्थिती निर्माण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.