आॅनलाईन लोकमतनागपूर : भाजपने जनतेला गृहित धरू नये. जनतेच्या मनात काय आहे हे आपण ठरवू शकत नाही. आपण म्हणू तीच पूर्व दिशा हे जनता कदापि खपवून घेणार नाही. भाजप नेते गुजरातमध्ये १५० जागा जिंकू असा दावा करीत होते. त्या आकड्याचं काय झालं? असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केला. विधानभवन परिसरात गुजरात निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.अजित पवार म्हणाले, गुजरातमध्ये भाजपची सत्ता स्थापन झाल्याचे निश्चित झाले असून. भाजप शंभरी पार जाताना दिसत आहे. सुरुवातीला भाजपचे काही नेते म्हणत होते गुजरातमध्ये १५० जागांशिवाय बोलूच नका, पण सुरुवातीला जेव्हा निकाल आले, तेव्हा काही काळ काँग्रेसने आघाडी बनवली होती. तेव्हा सर्व जगाने पाहिले, आपली लोकशाही किती प्रगल्भ आहे. मी सांगेल ती पूर्वदिशा हे जनता कदापि सहन करत नाही. येणाऱ्या काळात देशात निश्चितच मोठा बदल जनता घडवेल. या निकालाने विरोधी पक्षांना बळ मिळाले आहे. किती बारकाईने विचार करून लोक मतदान करतात, मला खात्री आहे. जेथे जेथे विरोधी पक्ष काम करतोय, तेथे कार्यकर्त्यांमध्ये आज उत्साहाचे वातावरण आहे.काँग्रेस प्रमुख राहुल गांधी व त्यांच्या चमूने गुजरातमध्ये आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यामुळे गुजरातमध्ये पंतप्रधान मोदी विरुध्द राहुल गांधी असेच राजकारण बघायला मिळाले. ज्या पध्दतीने राहुल गांधी आणि त्यांच्या चमूनी काम पाहिले त्यावर जनतेने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केल्याचे दिसते. जे २०१९ चा विचार न करता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा विचार करा असे सांगत होते त्यांच्यासाठी हा निकाल म्हणजे एक चपराक आहे. गुजरातमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी व्हावी असं वाटत होतं. काय घडले याबाबत माहिती नाही. मात्र, भविष्यात समविचारी पक्षांनी एकत्र आल्यास एक वेगळेच चित्र देशापुढे येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.