नागपूर : रेल्वेच्या पार्सल विभागातील काहींना हाताशी धरून दुरंतो एक्स्प्रेसने ‘गुपचूप’ मुंबईत पाठविलेल्या ‘त्या’ ६० लाख रुपयांच्या प्रकरणाचे काय झाले, असा प्रश्न विचारला जात आहे. मुंबईत रेल्वे सुरक्षा दलाकडून ही रोकड पकडण्यात आल्यामुळे या प्रकरणाचा भांडाफोड झाला होता.
येथील रेल्वे स्थानकाच्या पार्सल विभागात काही विशिष्ट व्यक्ती, दलाल नेहमीच घुटमळताना दिसतात. काही जणांना हाताशी धरून ते मोठी रोकड आणि प्रतिबंधित चिजवस्तू रेल्वेच्या पार्सल विभागातून पाहिजे त्या ठिकाणी पाठवतात. त्या बदल्यात मोठी कमाईही करतात.
‘लोकमत’ने २ एप्रिलच्या अंकात या संबंधाने वृत्त प्रकाशित करून संबंधित विभागाला आणि अधिकाऱ्यांना अलर्ट दिला होता. या पार्श्वभूमीवर, काही दलालांनी संगनमत करून एका सीलबंद पार्सलमधून ६० लाखांची रोकड मुंबईला पाठविली होती. विशेष म्हणजे, हे पार्सल १६ एप्रिलला येथील स्कॅनिंग मशीनला बाय पास करून डब्यात टाकण्यात आले होते. आरपीएफच्या पथकाने हे पार्सल मुंबईत पकडले.
नागपूरच्या संजय नामक व्यापाऱ्याने ही रोकड दलालांना हाताशी धरून अवैधपणे पार्सलमधून पाठविली होती, ही प्राथमिक माहिती पुढे आली. आता या प्रकरणाला दोन आठवडे झाले. त्या ६० लाखांचे काय झाले, अवैधपणे रोकड पाठविणाऱ्यांवर कोणती कारवाई झाली, ते अजून उघड झाले नाही. रेल्वेचे अधिकारी याबाबत अधिकृत माहिती देत नाहीत. या प्रकरणाची प्राप्तीकर खात्याकडून चाैकशी सुरू असल्याचे अधिकारी सांगतात. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून पार्सल विभागाशी संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली गेली किंवा केली जाणार, त्याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती मिळायला वाव नाही. परिणामी, या संबंधाने उलटसुलट चर्चा केली जात आहे.