नागपूर : जे राज्यसभेत झाले आहे तेच विधान परिषदेत होईल, असा इशारा भाजप नेते व राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी येथे दिला. राज्यसभेचे खासदार म्हणून विजयी झाल्यानंतर ते पहिल्यांदाच नागपूरला आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. नागपूर विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
खासदार बोंडे म्हणाले, राज्य सरकारमुळे महाराष्ट्राचे वाटोळे होत आहे. अपक्ष आमदार असो की अन्य कोणाचाही अपमान कोणीही करू नये. आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत असे आरोप करू नयेत. मात्र, संजय राऊत यांनी त्यांचा अपमान केला आहे. महाविकास आघाडीला फक्त जनताच नाही तर सर्व पक्षांसह अपक्ष आमदारही वैतागलेले आहेत. लोकांना देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळाची आठवण होत आहे. पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पाहिजेत, असे त्यांना वाटते.
भारतीय जनता पक्षात सर्वांना न्याय दिला जातो. संजय राऊत यांनी स्वतःच्या पक्षाकडे पाहावे. त्यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल बोलू नये. छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान शिवसेनेने केला आहे. शिवसेनेने एका मावळ्याला पराभूत करून सामान्य माणसात पाठवून त्यांचा अपमान केला आहे. भाजपमध्ये सर्वांना योग्य सन्मान मिळतो. पंकजा मुंडे आजही मोठ्या असून पुढे आणखी मोठ्या होतील. त्यामुळे त्याची काळजी संजय राऊत यांना करायची गरज नाही, असेही बोंडे एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.