नागपूर : बांगलादेशात सत्ता परिवर्तन झाले. त्यासाठी उठाव केला गेला. त्याची प्रतिक्रिया भारतात काही ठिकाणी उमटत आहे. बांगलादेश मध्ये जे घडले त्याचे परिणाम महाराष्ट्रातून येतील असे काही वाटले नाही. त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. महाराष्ट्रात काही ठिकाणी जे काही घडले ते राज्याच्या आणि समाजाच्या हिताचे नाही. आज शांततेची गरज आहे. यासाठी राजकारण, समाजकारणातील लोकांनी संयमाचा पुरस्कार करावा व शांतता कशी राहील याबद्दलची खबरदारी घ्यावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी दिला.
शनिवारी नागपुरात एका सत्कार सोहळ्यासाठी आले असता शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, बांगलादेशमध्ये हे घडले त्याप्रकारे येथे घडण्याचे काही कारण नाही. अन्य देशात घडलेल्या गोष्टींसाठी आपल्या देशातील सर्वसामान्य लोकांचे जीवन उद्धवस्त होईल किंवा संकटातील असे काही करू नये. शासनाची भूमिका आणि गृह खात्याची जबाबदारी यावर भाष्य करता येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी भाषण देताना सर्व देशाच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्या या पद्धतीची भूमिका मांडली. जम्मू-काश्मीर आणि हरियाणाची निवडणूक जाहीर झाली. झारखंड आणि महाराष्ट्राची मात्रा निवडणूक जाहीर झाली नाही. पंतप्रधानाचा महाराष्ट्र बद्दलचा निर्णय हा एक प्रकारचा विरोधाभास आहे. याबद्दल आणखी काय सांगायचे, असा टोला त्यांनी लगावला.