- ऑनलाईन एज्युकेशन : बिघडले हस्ताक्षर अन् मंदावली लिहिण्याची गती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समतोल साधता येत नसेल, तर तो गलंडतो, कोलमडतो. नेमकी अशीच स्थिती शिक्षण व्यवस्थेची झाली आहे. शिक्षण व्यवस्थेच्या खोलात नंतर कधी जाता येईल. मात्र, सद्यस्थितीत विद्यार्थी अक्षराकृतींच्या सरावापासून दुरावण्याचा धोका निर्माण झाला आहे. ज्याप्रमाणे लहानगा बाळ नवा नवा चालायला लागतो आणि समतोल साधण्याचा सराव नसल्याने मध्येच कोलमडतो. अगदी तसेच विद्यार्थी अक्षरसाधनेत गलंडत असल्याचे दिसून येत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, ऑनलाईन एज्युकेशन होय.
कोरोना संक्रमणामुळे लागू झालेल्या टाळेबंदीचा परिणाम म्हणून अगदी पहिल्या वर्गापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सारेच वर्ग ऑनलाईन भरत आहेत. शिक्षणाबाबत ही कायमस्वरूपी योजना नसली तरी यात भविष्यवेधी संधी शोधली जात आहे, हे सर्वश्रुत आहे. मात्र, ऑनलाईन एज्युकेशनचा प्राथमिक धोका मुलांना अक्षरसाधनेपासून वंचित करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेषत: ज्या घरात आई-वडील दोघेही कमावते आहेत, त्या घरांत तर हा धोका प्रचंड आहे. आधीच नवी पिढी इंग्रजी भाषेच्या आक्रमणामुळे मातृभाषेला मुकत आहे. अशा स्थितीत ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीममुळे लहान मुले अक्षरांच्या सरावाला मुकत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्ष वर्गात शिक्षक लहान मुलांना अक्षरओळख करून देण्यासह अक्षर लिखाणाचा सरावही करवून देत असतात. मुले घरी आली की, त्या अक्षरांची घोकंपट्टी सुरू असते. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांची आकलनक्षमता, श्रवणक्षमता वाढते का, हा संशोधनाचा विषय आहे. त्यात तथ्य असेलही. मात्र, ऑनलाईनमध्ये मुलांची अक्षरे लिहिण्याची गती मंदावली आहे आणि जेमतेम सुरू झालेला अक्षरांचे सराव संपल्याने या अक्षरांना मधातूनच फाटा फुटत असल्याचे दिसून येते. त्यामुळे ऑनलाईन एज्युकेशनच्या प्रभावात मुलांकडून अक्षरांचा सराव कसा करावा, यावर काम करणे अपेक्षित आहे.
--------------
शिक्षक/ पालकांनो हे करा
‘दिसामाजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे’ ही समर्थ रामदासांची रचना सर्वच स्तरांत महत्त्वाची ठरते. लहान मुलांना अक्षरसाधनेसाठी प्रेरित करण्यासाठी शिक्षक, पालकांनीच पुढाकार घ्यावा लागणार आहे.
१) मुलांमध्ये वाचनाची गोडी लागेल, तर लिखाणाची सवयही लागेल. त्याअनुषंगाने आवडीच्या गोष्टी, क्रमिक अभ्यासक्रमातील उतारे वाचण्यास सांगावे व ते आपल्या पद्धतीने लिहिण्यास सांगावे.
२) आईचे पत्र हारपले... सारखे खेळ आता लयास गेले आहेत. मुलांना नव्या गोष्टींचे आकर्षण असते. अशा खेळांचे पुनरुज्जीवीकरण केल्यास मुलांना अक्षरांची सराव साधता येईल.
३) अक्षरांशी संबंधित खेळांचे आविष्कार करावे. पत्र लिहिणे, चोर-पोलिसांच्या चिठ्ठ्यांचा खेळ, माझे स्वप्न आदींचे खेळ नव्याने सादर करता येऊ शकतील.
४) आकर्षक चित्रकथांच्या पुस्तकांचा आधार घेऊन मुलांना अक्षरसाधनेकडे सहज वळवता येईल.
-------------
बॉक्स....
रेडिमेडच्या सवयीपासून परावृत्त करा
मुलांना सगळेच रेडिमेड मिळत आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षणही रेडिमेडच झाले आहे. त्यापलीकडे जाऊन मुलांना प्रत्यक्ष कृतीवर भर देण्यास प्रेरित करणाऱ्या घडामोडी शिक्षक, पालकांना योजाव्या लागणार आहेत, अन्यथा मुलांची बोटे मोबाईलच्या आकड्यांवरच तरबेज होतील, प्रत्यक्ष कृतीत मात्र अपयशी ठरतील. ज्याप्रमाणे, मुले व्हिडिओ गेममध्ये शत्रूला नामोहरम करण्यासाठी सज्ज असतात आणि जिंकतातही. मात्र, प्रत्यक्ष मैदानात त्यांचे मेंदू, शरीर कच्चे असते, अगदी तशीच स्थिती ऑनलाईन शिक्षणाची आहे.
- राजेश परमार, मराठीचे तज्ज्ञ शिक्षक, नागपूर
-------------
* मुले सज्ज असतात
ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांना सोय झाली आहे. घरीच असल्याने मुले पटापट तयार होतात आणि वर्ग संपला की, खेळायला लागतात. अभ्यास चोख करीत असले तरी नेहमीचा सराव होत नसल्याचे दिसून येते. आम्ही आमच्या परीने ती तयारी करवून घेण्याचा प्रयत्न करतो.
- कल्याणी भाजे, पालक
* कमी अभ्यास, जास्त खेळणे
ऑनलाईन एज्युकेशनमुळे मुलांचा भर अभ्यासावर कमी आणि खेळण्यावरच जास्त असतो. शिक्षकांचा धाक नसल्याने मुले पालकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. मोबाईलच्या आहारी जाण्याची भीती बळावली आहे.
- स्वाती काळबांधे, पालक
........................