नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडाचा अहवाल अखेर आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी मंगळवारी नागपूरचे विभागीय आयुक्त व चौकशी समितीचे अध्यक्ष डॉ. संजीव कुमार यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांच्याकडून हा अहवाल सरकारकडे सादर केला जाणार आहे. यामुळे त्यांनी काही बोलण्यास नकार दिला. विशेष म्हणजे, घटनेला ११ दिवस होऊनही कुणावरच कारवाई झाली नाही. यामुळे भंडारा अग्निकांडाच्या अहवालात दडले काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) ९ जानेवारी रोजी पहाटे २ वाजताच्या सुमारास आग लागून तीन चिमुकल्यांचा जळून तर सात चिमुकल्यांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला. घटनेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीला पूर्वप्राथमिक अहवाल तीन दिवसांत देण्यास सरकारने सांगितले होते. मात्र समितीने नंतर दिवस वाढवून मागितले. आगीच्या घटनेची चौकशी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार होती. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या समितीचे नेतृत्व विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडे सोपविले. यासोबतच मुंबई महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन व अग्नी सुरक्षा आयुक्त पी. एस. रहांगदळे यांना तांत्रिक बाबींमध्ये मार्गदर्शन करण्यास नियुक्त करण्यात आले. समितीतील अन्य सदस्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. दीप्ती जैन, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता, अग्निशमन विभागाचे अग्निसुरक्षा तज्ज्ञ, आरोग्य सेवेतील बायोमेडिकल इंजिनिअर, जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रतिनिधी होते.
मंगळवारी सकाळी डॉ. तायडे यांनी हा अहवाल डॉ. संजीव कुमार यांच्याकडे सादर केला. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. संजीव कुमार यांनी याला दुजोरा दिला. ते म्हणाले, समितीतील काही सदस्य मुंबई येथील आहेत. अहवालावर त्यांची स्वाक्षरी झाल्यावरच सरकारकडे सादर केला जाईल. अहवालबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. समितीमध्ये एवढा मोठा ताफा असतानाही अहवाल सादर करण्यास उशीर झाल्याने शंकेच्या रडारवर असलेल्यांना ‘क्लीन चिट’ मिळते की कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.