सुमेध वाघमारे
नागपूर : आधी करिअर नंतर मूल, या निर्णयामुळे वयाच्या पस्तिशीनंतर गर्भधारणेचा निर्णय घेतला जातो; परंतु वाढत्या वयात गरोदरपणात व बाळंतपणात अनेक धोके संभावतात. शिकलेल्या तरुण जोडप्यांमध्ये याची माहिती असतानाही ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. एकट्या शासकीय डागा स्मृती महिला रुग्णालयात मागील पाच महिन्यांत ३५ ते ४० या वयोगटात ६९ प्रसूती झाल्या आहेत.
गर्भधारणेच्या निर्णयात जितका उशीर होतो तितका वंध्यत्वाचा धोका वाढतो. उशिरामुळे तयार होणाऱ्या बीजांची क्षमताही खालावते. गर्भ राहण्यात अडथळा येऊ शकतो. अशा महिलांमध्ये ‘न्यूरल ट्यूब डिफेक्ट’ व ‘डाऊन सिंड्रोम’ याचे प्रमाण अधिक आढळून येते. वाढत्या वयात थायरॉइड नियंत्रित राहत नसल्याने अनेक धोके निर्माण होऊ शकतात. सहाव्या व सातव्या महिन्यात रक्तदाब वाढल्याने फिटदेखील येऊ शकते. त्यामुळे ‘हेल्प सिंड्रोम’ होऊन जिवाला धोका होण्याचीही भीती राहत असल्याचे स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञाचे म्हणणे आहे.
-३२ सीझर तर ३७ नॉर्मल प्रसूती
डागा रुग्णालयात जानेवारी ते मे या पाच महिन्यांत ३५ ते ४० या वयोगटातील महिलांच्या ६९ प्रसूती झाल्या. यात ३२ सीझर तर ३७ नॉर्मल प्रसूती आहेत. या रुग्णालयात महिन्याकाठी वय वाढलेल्या १० ते १५ महिलांची प्रसूती होत असल्याचे पुढे आले आहे.
- बाळामध्ये जन्मजात विकृतीची शक्यता
डागा रुग्णालयातील वरिष्ठ स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ डॉ. सुलभा मूल यांनी ‘लोकमत’ला सांगितले, गर्भधारणेचे वय ३५ पेक्षा अधिक असल्यास जन्माला येणाऱ्या बाळामध्ये जन्मजात विकृती तसेच ‘डाऊन सिंड्रोम’ होण्याची शक्यता बळावते. ‘मिसकॅरेज’ व उपजत मृत्यू होऊ शकतो. अपुऱ्या दिवसांचे बाळंतपण, कमी वजनाचे बाळ जन्माला येण्याची गुंतागुंत होऊ शकते. वाढत्या वयामुळे गरोदरपणामुळे मधुमेह, रक्तदाब होऊ शकतो. प्रसूतीदरम्यान सिझेरियनची शक्यता जास्त बळावते.
- जोखमीच्या गरोदरपणाची लक्षणे
: रक्तस्राव किंवा पाण्यासारखा स्राव
: तीव्र डोकेदुखी
: सतत पोटात दुखणे
: बाळाची हालचाल मंदावणे
: लघवीत आग, जळजळ होणे
: अंधुक, अस्पष्ट किंवा डबल दिसणे
: चेहरा, हात, बोटे यांवर सूज येणे
- ही घ्या काळजी
डागा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवे यांनी सांगितले, वाढलेल्या वयात गर्भधारणेचा निर्णय घेत असाल तर गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘फॉलिक ॲसिड’च्या गोळ्या तीन महिन्यांआधीपासून घ्या. मधुमेह, उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवा. गरोदरपणाच्या सुरुवातीला सोनोग्राफी करा. जन्मजात विकृती ओळखण्यासाठी १२ ते १४ आठवड्यांपासून आवश्यक तपासण्या करा. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.