शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंचे योगदान काय?; अतुल लोंढे यांचा सवाल
By कमलेश वानखेडे | Published: January 13, 2024 06:51 PM2024-01-13T18:51:52+5:302024-01-13T18:52:12+5:30
लोंढे म्हणाले, नारायण राणे हे राजकीय स्वार्थासाठी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये व काँग्रेसमधून भाजपात गेले आहेत.
नागपूर : अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अजून पूर्ण झालेले नाही. हिंदू धर्मातील सर्वोच्च असलेल्या शंकराचार्यांनीही अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे आहे, असे स्पष्ट केले आहे. परंतु केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्यांचे योगदान काय, असा प्रश्न विचारून शंकराचार्य व हिंदू धर्माचा अपमान केला आहे. शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या राणे यांचे तरी काय योगदान आहे, असा प्रतिप्रश्न करत शंकराचार्यांचा अपमान करणाऱ्या राणे यांच्यावर भाजपने कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
लोंढे म्हणाले, नारायण राणे हे राजकीय स्वार्थासाठी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये व काँग्रेसमधून भाजपात गेले आहेत. भाजपात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी हिंदू धर्माच्या सर्वोच्च पदावरील शंकराचार्य यांनाच तुमचे योगदान काय? असा सवाल विचारून त्यांनी सर्व मर्यादा पार केल्या आहेत. हिंदु धर्माच्या परंपरेनुसार वयाच्या ५१ ते ७५ वर्षांचा कालखंड हा वानप्रस्थाश्रमात घालवायचा असतो. या कालखंडात सर्वच क्षेत्रातून बाहेर पडून समाजोपयोगी कामे करावीत असे अपेक्षित आहे. नारायण राणे यांचे वय ७१ वर्ष आहे त्यांनी आता वानप्रस्थाश्रमाचा मार्ग धरावा असा, टोलाही त्यांनी लगावला.