कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दर बुधवारी शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. देखभालीच्या नावाखाली ‘आॅक्टोबर हीट’मध्येदेखील महावितरणतर्फे हे पाऊल उचलण्यात येते. मात्र दर आठवड्यात देखभाल होत असतानादेखील काँग्रेसनगर विभागातील बहुतांश ‘डीपी’ उघड्या अवस्थेत आहेत. तसेच विजेचे ‘आॅडिट’ करून चोरी उघड करण्यासाठी लावण्यात आलेले ‘मीटर्स’चीदेखील दुरवस्था दिसून आली. अशास्थितीत प्रत्यक्षात बुधवारी ‘महावितरण’कडून नेमके काम काय होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.वीजहानी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने २००२-२००३ मध्ये ‘एपीडीआरपी’ची म्हणजेच वेगवान विद्युत विकास व सुधार कार्यक्रमाची सुरुवात केली. याअंतर्गत चुकीचे ‘मीटर रीडिंग’, वीजचोरीवर नजर ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ‘डीटीसी मीटर’ लावण्यात आले. मात्र काँग्रेसनगर विभागांतर्गत येणाऱ्या लक्ष्मीनगर परिसरात या ‘मीटर्स’ची अवस्था अतिशय वाईट आहे. बहुतांश ‘डीटीसी’ उघडे आहेत. त्यांच्यावरील झाकण गायब आहे. काही ठिकाणी तर ‘मीटर’च नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी विजेच्या तारांवर वेली असल्याचे दिसून आले. मात्र तरीदेखील दर बुधवारी ‘शटडाऊन’ करून काँग्रेसनगर विभागातील नागरिकांची परीक्षा पाहण्यात येते.
‘मॉडेम’कडे लक्ष नाही‘डीटीसी मीटर्स’ला ‘मॉडेम’च्या आधारे ‘कंट्रोल रूम’शी जोडण्यात आले आहे. मात्र या ‘मॉडेम्स’कडे कुणीच लक्ष देत नाही. अनेक ठिकाणी तर ‘मॉडेम’ बंद झाले आहेत व लाखोंची उपकरणे ‘ट्रान्सफॉर्मर’वर केवळ लटकली आहेत.
काय होता उद्देश?‘डीटीसी मीटर’लावण्याचा उद्देश हा ‘ट्रान्सफॉर्मर’वरून पुरविण्यात येणाºया विजेचे ‘आॅडिट’ करणे हा आहे. ‘ट्रान्सफॉर्मर’मधून किती वीज जात आहे आणि प्रत्यक्षात किती वापरात आहे, हे या ‘मीटर्स’च्या ‘रीडिंग’वरून स्पष्ट होते. दोन्हीमध्ये फरक दिसून आल्यास वीजचोरी होत असल्याचे संकेत मिळतात. प्रत्येक ग्राहकावर लक्ष ठेवणेदेखील या माध्यमातून शक्य आहे.
अनेक चोरी झाल्या उघड‘महावितरण’च्या क्षेत्रात ज्या ‘डीटीसी मीटर्स’वर लक्ष दिले जात नाही, त्याच ‘मीटर्स’च्या मदतीने ‘एसएनडीएल’ने मागील महिन्यात लाखो रुपयांची वीजचोरी पडकली. २००५ मध्ये याच ‘महावितरण’ने ‘डीटीसी मीटर्स’च्या मदतीने वीज नुकसानीवर नियंत्रण आणले होते. ‘महावितरण’चे अधिकारी जाणूनबुजून ‘डीटीसी मीटर्स’कडे लक्ष देण्यास व वीजचोरी थांबविण्याबाबत गंभीर नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.