योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात भ्रष्टाचार व महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या आरोपांबाबतच्या तक्रारीवर काय पावले उचलण्यात आली अशी विचारणा गृहगविभागाकडून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना करण्यात आली आहे. गृहविभागाचे उपसचिव राजेश गोविल यांनी यासंदर्भातील पत्र आयुक्तांना पाठविले आहे.
नागपूर महापालिकेत आयुक्त असताना मुंढे यांनी नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचीही सूत्रे हाती घेतली होती. स्मार्ट सिटीत त्यांनी २० कोटी रुपयांचा गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन महापौर संदीप जोशी तसेच भाजपच्या तत्कालिन पदाधिकाऱ्यांनी सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सातच दिवसांनी एका महिला कर्मचाऱ्याने सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारींचे पुढे काय झाले, याची विचारणा भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी माहिती अधिकारांतर्गत केली. त्यांना योग्य उत्तर प्राप्त न झाल्याने त्यांनी माहिती आयोगाकडे अपील केले. माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी तातडीने प्रकरणाची दखल घेण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर खोपडे यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून मुंढे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत पत्रदेखील लिहीले होते. पोलीस आयुक्तांना संबंधित प्रकरणातील कार्यवाहीचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र पोलीस विभागाने त्यावर काहीच उत्तर दिले नाही. यावर खोपडे यांनी परत पत्र लिहून विचारणा केली होती. यावर गृहविभागाचे उपसचिव राजेश गोविल यांनी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून संबंधित प्रकरणातील कार्यवाहीचा अहवाल १२ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.