ऑनलाइन लोकमत -
‘पॅकेज’ नको, युवकांचा विचार करा : निरक्षरता हा देशासाठी शाप
नागपूर, दि. 30 - भारतात लोकसंख्येच्या तुलनेत ६५ टक्के युवक आहेत. जगात सर्वाधिक युवाशक्ती भारताकडे आहे. युवकांनी निव्वळ पैशाच्या मागे न धावता आपल्या देशाला शक्तिशाली बनविण्याचा विचार करावा, असे आवाहन केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या परीक्षेत देशभरातून दुसरे स्थान मिळविलेल्या काश्मीर येथील अतहर अमीर उल शफी खान यांनी शनिवारी केले.
छात्रजागृती व युगांधर फाऊं डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रभाषा संकु लातील साई सभागृहात आयोजित संवाद व मार्गदर्शन कार्यक्रमातअतहर अमीर उल शफी खान बोलत होते.
जगातील प्रगत देशांच्या तुलनेत भारतात युवाशक्ती अधिक आहे. या मानवी संसाधनाचा वापर विधायक व देशाच्या विकासासाठी झाला तरच पुढील १०-१५ वर्षात भारत महाशक्ती होईल. मागील ६० वर्षात देशाचा विकास झाला, परंतु आजही देशात २२ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. त्यांच्यापुढे दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न आहे. दोन टक्के मुले शाळाबाह्य असून जगात सर्वाधिक निरक्षर भारतात आहेत. ही बाब देशासाठी भूषणावह नाही. परिस्थिती विपरित असली तरी यावर मात करावी लागेल, असे मत अतहर अमीर उल शफी खान यांनी मांडले.