लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : सावनेर-पारशिवनी-रामटेक मार्गाचे नुकतेच चाैपदरीकरण करण्यात आले असून, या मार्गावर पथदिवेही लावण्यात आले आहेत. मात्र, हे पथदिवे कित्येक महिन्यापासून बंद असल्याने त्यांचा उपयाेग काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दुसरीकडे, अंधारामुळे या मार्गावर सरपटणाऱ्या विषारी प्राणी व किटकांचा वावर वाढल्याने ते धाेकादायक ठरण्याची शक्यता बळावली आहे.
सावनेर-पारशिवनी-आमडीफाटा-रामटेक या मार्गाच्या सिमेंटीकरण व चाैपदरीकरणाचे काम तीन वर्षापूर्वी पूर्ण करण्यात आले. या कामाचे कंत्राट एच. जी. इन्फ्रा नामक कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले हाेते. राेडचे काम पूर्ण झाल्यानंतर मध्यभागी दुभाजक तयार करून पथदिवेही लावण्यात आले. सुरुवातीचे काही महिने हे पथदिवे व्यवस्थित सुरू हाेते. नंतर हळूहळू त्यात बिघाड निर्माण व्हायला सुरुवात झाली. शिवाय, बिघाड दुरुस्त करण्याकडेही दुर्लक्ष केले जाऊ लागले.
पारशिवनी शहरातून गेलेल्या या मार्गावरील शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैक ते पेंच फाटा दरम्यानचे पथदिवे कित्येक महिन्यांपासून बंद आहेत. उर्वरित पथदिव्यांपैकी काही सुरू आहेत तर काही बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागताे. त्यामुळे ही समस्या साेडविण्याची मागणी मनोज चकोले, मनोज पालीवाल, डॉ. तेजराम गुरधे, ऋषी कुंभलकर, विनोद मस्के, गुलाब राऊत, नरेंद्र जयस्वाल, अश्विन खोब्रागडे, रामा चोपकर, बंडू चिखलकर, रामेश्वर मोहरकर, लक्ष्मण चोपकर, सुरेश साखरकर यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
...
देखभाल, दुरुस्ती महामार्ग प्राधिकरणाकडे
या मार्गाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. पथदिवे बंद असल्याने तसेच रात्रीच्यावेळी राेडवर साप, विंचू व इतर विषारी प्राणी व किटकांचा वावर वाढत असल्याने नागरिकांना पायी चालताना असुरक्षितता जाणवते. पथदिव्याचा एक खांब वाकला असून, ताे सरळ करण्याची अथवा बदलविण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही. ताे खांब काेसळून अपघात हाेण्याची शक्यता बळावली आहे. विजेचा खर्च वाचविण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे.