लाेकमत न्यूज नेटवर्क
पिपळा (डाकबंगला) : वाहनचालकांसह नागरिकांच्या साेयीसाठी नागपूर-सावनेर-ओबेदुल्लागंज (भाेपाळ) या राष्ट्रीय महामार्गाला जाेडणाऱ्या पिपळा (डाकबंगला) - वलनी सर्व्हिस राेडलगत हायमास्ट दिवे बावण्यात आले आहेत. मात्र, ते कधी तरी पाच-सात मिनिटांसाठी सुरू हाेतात व परत बंद हाेतात. हा प्रकार सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे या मार्गावर अंधारामुळे रात्रीच्या वेळी किरकाेळ अपघातही वाढल्याने या हायमास्ट दिव्यांचा उपयाेग काय, असा प्रश्न या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या मार्गावर पूल असून, त्या पुलाखालून वलनी, इसापूर, गोसेवाडी, पिपळा (डाकबंगला) यासह परिसरातील गावांमधील नागरिकांची सतत रहदारी सुरू असते. त्यामुळे याठिकाणी नागरिकांच्या साेयीसाठी हायमास्ट दिवे लावले आहेत. हे दिवे सहा महिन्यांपासून कधी तरी पाच ते सात मिनिटांसाठी सुरू हाेताे आणि लगेच बंद हाेताे. अंधारामुळे या ठिकाणी किरकाेळ अपघातांचे प्रमाण वाढत चालले असून, माेठा अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंधारामुळे या पुलाच्या परिसरातून जाताना भीती वाटत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.
नागपूर- ओबेदुल्लागंज या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६९ च्या चाैपदरीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी ओरिएंटल स्ट्रक्चरल अभियंता प्रा. लि. नामक कंपनीने केले आहे. याच कंपनीने पिपळा (डाकबंगला) येथे सर्व्हिस रोडलगत हायमास्ट दिवे लावले आहेत. हे दिवे सुरुवातीपासून बंद असल्याने या भागातील नागरिकांसह पिपळा (डाकबंगला) ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत कंपनी व्यवस्थापन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे अनेकदा तक्रारी केल्या; परंतु ते अद्यापही सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे या दिव्यांची तातडीने दुरुस्ती करून द्यावी तसेच देखभालीसाठी ते ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावे, अशी मागणी नागरिकांसह वाहनचालकांनी केली आहे.