सज्जन पाटील
लाेकमत न्यूज नेटवर्क
मांढळ : मांढळ हे कुही तालुक्यातील मुख्य बाजारपेठेसाेबतच सर्वात माेठे गाव आहे. येथे बसस्थानकाच्या नावावर तयार केलेल्या प्रवासी निवाऱ्याची तेवढीच माेठी दुरवस्था झाली आहे. हा निवारा काही महिन्यापासून मातीच्या ढिगाऱ्याआड दबला आहे. त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांना राेडलगत उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. यात महिला, लहान मुले व विद्यार्थिनींची माेठी गैरसाेय हाेत आहे. त्यामुळे या प्रवासी निवाऱ्याचा उपयाेग काय आहे, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.
मांढळची लाेकसंख्या १५ हजाराच्या वर आहे. येथे कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने शेतमालासाेबतच गुरांचा माेठा बाजार भरताे. गावात बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, राष्ट्रीयीकृत व माेठ्या खासगी बँका, प्राथमिक आराेग्य केंद्र व खासगी दवाखाने तसेच विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये असल्याने, मांढळ येथे कुही तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकरी, बहुतांश गावांमधील नागरिक व परिसरातील गावांमधील विद्यार्थ्यांचा थेट संबंध येताे.
तालुक्यातील बहुतांश शेतकरी व नागरिक बस अथवा खासगी प्रवासी वाहनाने मांढळ येथे येतात. येथे बसस्थानकाच्या नावावर तयार केलेल्या प्रवासी निवाऱ्याच्या दैनावस्थेमुळे प्रत्येकाला तिन्ही ऋतूत राेडलगत उभे राहून बस व खासगी प्रवासी वाहनांची प्रतीक्षा करावी लागते. विशेष म्हणजे, या निवाऱ्याची अवस्था व प्रवाशांची गैरसाेय याबाबत स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, आमदार, प्रशासकीय अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांना माहिती आहे. मात्र, प्रत्येक जण त्या निवाऱ्याची दुरवस्था बघून धन्यता मानत आहे. त्यामुळे हा निवारा अतिक्रमणमुक्त करून त्याची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला कधी जाग येणार, असा प्रश्नही शेतकऱ्यांसह नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
...
मूलभूत सुविधांचा अभाव
या बसस्थानक नामक प्रवासी निवाऱ्याचे छत तुटले असून, त्यातून पाणी गळते. खड्डे तयार झाल्याने तिथे बसणे तर साेडा, साधे उभेही राहणे अवघड झाले आहे. या ठिकाणी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व इतर मूलभूत सुविधा नसल्याने लहान मुले, महिला, तरुणी व विद्यार्थिनींची कुचंबणा हाेते. त्यांना असामाजिक तत्त्चाच्या लाेकांनाही ताेंड द्यावे लागते.
...
अतिक्रमणाचा विळखा
या प्रवासी निवाऱ्याच्या संपूर्ण परिसरात शेजारच्या दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. मध्येच मातीचा ढिगारा टाकण्यात आल्याने आत जाणे शक्य नाही. जिल्हा परिषद प्रशासनाने तयार केलेल्या या प्रवासी निवाऱ्याच्या देखभालीची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडे आहे. मात्र, ग्रामपंचायत पदाधिकारी या निवाऱ्याची दुरवस्था व अतिक्रमण याकडे लक्ष द्यायला तयार नाही.