धापेवाडा : कळमेश्वर तालुक्यात धापेवाडा खुर्द ते धापेवाडा बु. दरम्यान चंद्रभागा नदीवर नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र नदीला थोडाही पूर आला तरी पूल पाण्याखाली येतो. त्यामुळे या पुलाचा उपयोग काय, असा प्रश्न ग्रामस्थांकडून केला जात आहे.
धापेवाडा येथील मुख्य बाजारपेठ धापेवाडा (बु) येथे आहे. सर्व प्रकारची खरेदी, बँकिंग व्यवहार करण्यासाठी धापेवाडा खुर्द येथील नागरिकांना धापेवाडा बु. येथे जावे लागते. या दोन्ही गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी पूर्वी कळमेश्वर सावनेर मार्गावरील पुलाचा पर्याय होता. मात्र हे अंतर लांब असल्याने धापेवाडा खुर्द ते बु. साठी चंद्रभागा नदीच्या पात्रात लहान पुलाचे बांधकाम करण्यात आले. हा पूल केवळ सिमेंटच्या आडव्या पाईपवर बनविण्यात आल्याने या पुलाची उंची अत्यंत कमी आहे. त्यामुळे नदीचे थोडे जरी पाणी वाढले तरी पूल पाण्याखाली येतो. त्यामुळे नागरिकांचा ये-जा करण्याचा प्रश्न जैसे थे आहे.
---
चंद्रभागा नदीला आलेल्या पुरामुळे पात्रात अदृश्य झालेला पूल.