फहिम खान ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘स्मार्ट अॅन्ड सेफ सिटी प्रोजेक्ट’अंतर्गत शहरातील बस स्थानकांवर ‘स्मार्ट किओस्क’ मशीन लावण्यात आल्या आहेत. परंतु या ‘मशीन्स’चा काहीही उपयोग होत नसून अक्षरश: धूळ खात पडल्या असल्याचे चित्र आहे. ‘स्मार्ट सिटी’ योजनेंतर्गत शहरातील एकूण २०० बसस्थानकांना ‘स्मार्ट’ बसस्थानकांचा दर्जा देण्यात येणार आहे. परंतु यापैकी केवळ ४१ बसस्थानकांवर या ‘स्मार्ट मशीन्स’ लागल्या आहेत. परंतु त्यांना वापरण्यात अनेक अडचणी येत आहेत. ‘लोकमत’ने ‘आॅन द स्पॉट’ पोहोचून ‘मशीन्स’चा उपयोग करण्याचा प्रयत्न केला. परंतु बहुतांश ‘स्मार्ट किओस्क’ धुळीने माखलेल्या व बंद अवस्थेत दिसून आल्या.प्रस्तुत प्रतिनिधीने सर्वात अगोदर अमरावती मार्गावरील वाडी नाका क्रमांक १० येथील शहर बसथांब्याला भेट दिली. ‘स्माट सिटी’ प्रकल्पांतर्गत या बसस्थानकावर एक काचेचे ‘केबिन’ बनविण्यात आले असून त्यात ‘स्मार्ट किओस्क’ लावण्यात आले आहे. प्रतिनिधीने काचेच्या ‘केबिन’मध्ये प्रवेश केला व ‘स्मार्ट मशीन’च्या ‘स्क्रीन’वरील विविध ‘आयकॉन्स’ वाचण्यास सुरुवात केली. ‘स्क्रीन’वर एकाच वेळी नऊ ‘आयकॉन्स’ दिसून येत होते. सर्वात अगोदर ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट’च्या ‘आयकॉन’वर बोट ठेवले असता मशीनकडून काहीच ‘रिस्पॉन्स’ मिळाला नाही. दुसऱ्यांदादेखील तसेच झाले. त्यानंतर ‘स्क्रीन’च्या डाव्या बाजूला पाहिले असता ४ फेब्रुवारी २०२० ही तारीख दिसली. याचा अर्थ ‘किओस्क’ हे ‘अपडेट’ असल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर प्रतिनिधीने ‘स्क्रीन’च्या खाली लिहिलेली सूचना वाचली. कुठल्याही ‘आयकॉन’ला ‘क्लिक’ करा व सेवेचा लाभ घ्या, असे त्यात लिहिले होते. त्यानंतर परत एकदा ‘आपले सरकार’ सेवाच्या ‘आयकॉन’ला ‘क्लिक’ केले असता त्याचा काहीच परिणाम झाला नाही. वारंवार विविध ‘आयकॉन्स’ला ‘क्लिक’ केले असता तेच चित्र दिसून आले.
अधिकाऱ्यांचा दावा, सर्व ‘मशीन’ कार्यरतयासंदर्भात ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाचे ‘सीईओ’ डॉ.रामनाथ सोनवणे यांना विचारणा केली असता त्यांनी सर्व ‘मशीन्स’ कार्यरत असल्याचा दावा केला. अगोदर शहरातील ४० बसस्थानकांवर ‘स्मार्ट किओस्क’ मशीन लावण्यात येणार होत्या. मात्र आम्ही ४१ ‘मशीन’ लावल्या आहेत. सोबतच शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्येदेखील २५ ‘किओस्क’ लागल्या आहेत. आमच्या तांत्रिक अधिकारी शुभांगी गाडवे यांच्या चमूने शहरातील सर्व ‘मशीन्स’ची तपासणी केली असून त्या सुरू असल्याचे निश्चित केले आहे, असे त्यांनी सांगितले.
मदतीच्या ‘आयकॉन’वरदेखील ‘रिस्पॉन्स’ नाहीचया सर्व ‘आयकॉन’च्या खाली प्रस्तुत प्रतिनिधीला ‘हेल्प’ असे लिहिलेला एक लहान ‘आयकॉन’ दिसला. यावर ‘क्लिक’ केले असता ‘मशीन’चा वापर कसा करावा याबाबत काहीतरी मदत मिळेल असे वाटले. परंतु यावर दोन ते तीन वेळा ‘क्लिक’ केल्यावरदेखील काहीच ‘रिस्पॉन्स’ मिळाला नाही.
‘मशीन’ने ऐकलेच नाहीबसस्थानकावर लागलेल्या ‘स्मार्ट किओस्क’ने काहीच ‘रिस्पॉन्स’ दिला नाही. त्यामुळे प्रस्तुत प्रतिनिधीने पूर्ण ‘मशीन’चे सखोल निरीक्षण सुरू केले. एका ठिकाणी ‘येथे बोला’ असे लिहिलेले दिसून आले. ‘मशीन’जवळ जाऊन ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट’ असे बोलले असतादेखील ‘स्क्रीन’वर काहीच परिणाम झाला नाही. प्रतिनिधीने अशा प्रकारे प्रत्येक ‘आयकॉन’चे नाव घेतले. परंतु ‘मशीन’ने अखेरपर्यंत काहीच ऐकले नाही.केवळ नावापुरतेच ‘स्मार्ट’‘स्मार्ट किओस्क’ असे या ‘मशीन’चे नाव असले तरी प्रत्यक्षात त्याला नावापुरतेच ‘स्मार्ट’ म्हणावे लागेल. ‘केबिन’च्या काचा अस्वच्छ होत्या व ‘मशीन’ धुळीने माखलेली होती. ‘मशीन’मध्ये पैसे टाकण्यासाठी बनविण्यात आलेल्या जागेतदेखील धूळ साचली होती. तसेच नागरिकांना विविध कागदपत्रे व योजनांच्या अर्जांचे ‘प्रिंट आऊट’ जेथून मिळतील तेथेदेखील धूळच दिसून आली. ‘बारकोड’, ‘क्यूआर कोड’ ठेवण्याच्या जागेवरदेखील असेच चित्र होते. येथे इतकी धूळ होती की ‘मशीन’ सुरू असती तरी ‘बारकोड’ला ‘स्कॅन’ करता आले नसते.