बेलाेना : गावाची वाढती लाेकसंख्या, पिण्याच्या पाण्याची मागणी आणि पाणीपुरवठा याेजनेला केला जाणारा वीजपुरवठा व विजेची समस्या लक्षात घेता येथील पाणीपुरवठा याेजनेच्या विहिरीजवळ साैरऊर्जा संयंत्र लावून माेटरपंपही खरेदी करण्यात आला. मात्र, हा माेटरपंप तीन वर्षांपासून बंद आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही या साैरऊर्जा माेटरपंपचा वापर केला जात नाही. त्यामुळे या माेटरपंपचा उपयाेग काय, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
ग्रामीण भागात विजेची माेठी समस्या आहे. काही कारणास्तव वीजपुरवठा खंडित झाल्याने गावातील पाणीपुरवठा याेजना व गावाचा पाणीपुरवठा प्रभावित हाेताे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाच्या पारेषण सौरऊर्जा पंपाद्वारे लघुजल व नळ पाणीपुरवठा कार्यक्रमांतर्गत बेलाेना (ता. नरखेड) ग्रामपंचायतला साैरऊर्जा माेटरपंप देण्यात आला. त्यासाठी पाणीपुरवठा विहिरीपासून गावातील पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईनही टाकण्यात आली. यासाठी ५ लाख ३७ हजार ९३६ रुपयांचा खर्च करण्यात आला. हा खर्च राज्य शासनाच्या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जाच्या माध्यमातून करण्यात आला.
ही याेजना पूर्णत्वास नेण्यासाठी नागपूर येथील बीटेक इंजिनियर्स नामक कंपनीला कंत्राट दिले हाेते. ही याेजना तीन वर्षापूर्वी म्हणजे २०१८ मध्ये पूर्णत्वास आली. त्यानंतर १२ जुलै २०१८ पासून आजवर या याेजनेचा माेटरपंप एकदाही सुरू करण्यात आला नाही. आधीच विजेची माेठी समस्या असल्याने ही साैरऊर्जा माेटरपंप याेजना गावासाठी फायद्याची ठरली असती. परंतु, कामाच्या अस्पष्टतेतुळे ही महत्त्वाची याेजना कुचकामी ठरली आहे.
...
प्रमाणपत्राचा तिढा
या याेजनेंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरीत ७.५ अश्वशक्तीचा माेटरपंप बसवण्यात आला आहे. कंत्राटदार त्याची काही प्रलंबित देयके व याेजनेचे काम पूर्ण झाल्याच्या प्रमाणपत्राची ग्रामपंचायतकडे मागणी करीत आहे. दुसरीकडे, कंत्राटदाराने आधी याेजना कार्यान्वयित करून द्यावी. नंतर देयके व प्रमाणपत्र दिले जाईल, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी वामन दामेदर यांनी दिली. हा तिढा कधी साेडविला जाईल आणि ही याेजना कधी सुरू हाेईल, याचे उत्तर सध्या कुणाकडेही नाही.