लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात आयोजित केलेल्या खासदार महोत्सवात अभिनेत्री व जगप्रसिद्ध नृत्यांगना हेमामालिनी यांना नाचविण्याची गरजच काय होती, असा वादग्रस्त सवाल नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. ‘ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेस नागपूर चॅप्टर’ आणि नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित ‘नो युवर कॅन्डिडेट’ या कार्यक्रमात नाना पटोले यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले.नितीन गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वी नागपूर येथे खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात जगप्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना आणि अभिनेत्री खासदार हेमामालिनी यांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचा संदर्भ घेत नाना पटोले यांनी ही टीका केली. मी निवडून आलो तर नागपूरचा सांस्कृतिक वारसा आणखी मजबूत करेन, असे पटोले म्हणाले. नितीन गडकरी नागपूरचे विकास पुरुष आहेत का, या प्रश्नावर पटोले म्हणाले, पाच वर्षांत शहराला खोदण्याचे काम केले. सिमेंट रस्त्यामुळे नागपूरचे तापमान ४ डिग्रीने वाढणार आहे. नागपुरात १.२० लाख लोकांना नोकऱ्या देण्याचे गडकरी यांचे आश्वासन फोल ठरले. लोकांना नोकऱ्या तर मिळाल्या नाहीत. नवीन उद्योग न येता मिहानमधील उद्योग बंद पडले. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे उद्योग बंद झाले तर अनेकांचे रोजगार हिरावले. सिमेंट रस्त्यांमुळे मनपावर कर्जाचा डोंगर वाढला. त्यामुळे ९०० रुपयांचा प्रॉपर्टी कर ९ हजारांपर्यंत वाढला. पटोले म्हणाले, शहराला मेट्रो रेल्वेची गरज नव्हती. या प्रकल्पाच्या नावाखाली लोकांच्या मोक्याच्या जागा बळकावल्या. सत्तेवर आल्यास मेट्रो कंपनीसोबत झालेल्या कराराची चौकशी करणार आहे. शहरात २४ तास पिण्याचे पाणी मिळत नाही. केवळ बिल वाढले आहे. शहरात टँकरने पाणी पुरवठा होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ खून होत आहेत आणि शहरात बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. नागपुरात दहशत पसरली आहे. लोकांना भाजपचे सरकार नकोसे झाले आहे. लोकांच्या विश्वासावर निवडून येणार असल्याचा दावा पटोले यांनी केला.केंद्रातील मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. युवा शक्तीने राजकारणात यावे, असे सांगताना पटोले यांनी किती मतांनी निवडून येणार, यावर मात्र मौन बाळगले. ही मुलाखत ‘लोकमत’चे वाणिज्य संपादक सोपान पांढरीपांडे यांनी घेतली.