लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सभागृहात विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी म्युट करण्याचा प्रकार गुरुवारी महापालिकेच्या ऑनलाईन सभागृहात घडला. यामुळे संतप्त झालेले विरोधी पक्षनेते तानाजी वनवे आपल्या कक्षातून थेट स्यायी समिती कक्षात धडकले. सभागृहात काय हा तमाशा लावला, असा सवाल करीत महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे निषेध व्यक्त केला. बसपाचे गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांनीही विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.
सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर चर्चा सुरू असताना तानाजी वनवे यांनी बोलण्याला सुरुवात करताच त्यांचा माईक म्युट करण्यात आला. त्यांनी तीन-चार वेळा बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. दुसरीकडे सत्तापक्षातील आमदार प्रवीण दटके, अविनाश ठाकरे, धर्मपाल मेश्राम यांना महापौरांनी बोलण्याची संधी दिली. यामुळे संतप्त झालेले तानाजी वनवे थेट सभागृहात पोहचले व या प्रकाराबध्दल महापौरांकडे नाराजी व्यक्त केली. सभागृहात विरोधकांनी बोलायचेच नाही का, असा सवाल महापौरांना केला.
घोडेस्वार यांनीही व्यक्त केली नाराजी
प्रश्नात्तोराच्या तासात बसपा गटनेते यांनी दुर्बल घटक योजनेंतर्गत २०१७-१८ ते २०२० -२१ या चार वर्षात अर्थसंकल्पातील तरतुदीच्या तुलनेत निधी खर्च झाला नसल्याचा प्रश्न उपस्थित केला. महापौरांनी घोडेस्वार यांचा प्रश्न पुकारला. परंतु तांत्रिक कारणाने घोडेस्वार यांचा काही वेळ संपर्क झाला नाही. याच विषयावर सत्तापक्षाचे संदीप जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला असल्याने महापौरांनी त्यांना बोलण्याची संधी दिली. त्यानंतर घोडेस्वार यांनी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना बोलता आले नाही. यावर त्यांनी नाराजी व्यक्त करीत हा विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.
तांत्रिक बिघाडामुळे गोंधळ
ऑनलाईन सभागृहात सदस्य बोलत असताना त्यांचा आवाज ऐकायला येत नव्हता. वैशाली नारनवरे बोलत असताना तुटक आवाज येत होता. त्या काय बोलत आहेत. हे कळत नव्हते. प्रवीण दटके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर महापौरांनी निर्णय जाहीर करून पुढील प्रश्न पुकारला. परंतु आवाज बंद असल्याने महापौरांनी काय निर्णय दिला याची सदस्यांना माहिती मिळाली नाही. त्यामुळे काही वेळाने दटके यांनी महापौरांना पुन्हा निर्णय जाहीर करण्याची विनंती केली.