मंगेश व्यवहारे नागपूरनागपूरकरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून ‘आयवॉच पोलीस’ या अॅपचे लाँचिंग केले. अॅपच्या लाँचिंगनंतर नागपुरातील हजारो स्मार्टफोन युजर्सने हे अॅप पहिल्याच दिवशी डाऊनलोड केले. ज्या नियंत्रण कक्षातून यंत्रणा हाताळली जाणार आहे, तिथले कर्मचारी संभ्रमात होते. पोलिसांनी ज्या उद्देशाने अॅप लाँच केले, त्या उद्देशाला पहिल्याच दिवशी हरताळ फासल्याचे दिसले.सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असे हे अॅप आहे. नि:शुल्क असल्याने हजारो स्मार्टफोन युजर्सने आज डाऊनलोड करून घेतले. दर दहा मिनिटाला १५ ते २० युजर्स डाऊनलोड करीत होते. यंत्रणेचे संचालन नियंत्रण कक्षातील पोलीस कर्मचारी करणार आहे. यासाठी नियंत्रण कक्षात संगणक संच उपलब्ध केला आहे. सोबत संपर्क यंत्रणाही येथे उपलब्ध केली आहे. एका पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नियंत्रणात ही यंत्रणा कार्यरत आहे. लाँचिंगच्या पहिल्याच दिवशी नियंत्रण कक्षातील संगणक संच बंद दिसले. येथील कर्मचारी, अधिकारी ही यंत्रणा कशी हाताळावी या संभ्रमात होते. काही कर्मचाऱ्यांना अॅपबद्दल माहिती नसल्याचे आढळले. जनतेने डाऊनलोड केले असले तरी, ही यंत्रणा हाताळणाऱ्यांनी डाऊनलोड करण्याची तसदीही घेतली नव्हती. काही कर्मचाऱ्यांजवळ स्मार्ट फोनही नव्हते. पहिल्याच दिवशी पोलीस प्रशासनाकडून मिळालेला प्रतिसाद अतिशय उदासीन होता. येथील संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता, याचे प्रशिक्षण मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात अॅप निर्मात्या कंपनीच्या प्रतिनिधींना विचारणा केली असता, यासाठी काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे, यंत्रणेत जर त्रुटी असतील, तर लवकरच दूर होतील, असे त्यांनी सांगितले.
‘आयवॉच’वर वॉच कुणाचा ?
By admin | Published: February 26, 2015 2:11 AM