निशांत वानखेडे
नागपूर : शहरातील कडुनिंबाची झाडे अचानक सुकायला लागल्याने पर्यावरणवाद्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. धक्कादायक म्हणजे कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर दक्षिणेकडील राज्यानंतर महाराष्ट्रातही कडुनिंबाच्या झाडाला हाेणाऱ्या या आजाराचा प्रादुर्भाव वाढला असून नागपूरमध्येही हे चित्र दिसायला लागले आहे. वनस्पती तज्ज्ञांच्या मते या आजारावर उपाययाेजना करणे अशक्यप्राय असल्याने चिंता अधिकच वाढली आहे.
विशेष म्हणजे कडुनिंबाचे झाड आजारमुक्त झाड म्हणून ओळखले जाते. झाडाची पाने, फांद्या व खाेड मानवी शरीरासाठी आराेग्यदायी मानले जाते आणि पेस्टीसाईड म्हणून दात घासण्याच्या पेस्टपासून अनेक वस्तूंमध्ये कडुनिंबाचा उपयाेग केला जाताे. मात्र हेच कडुनिंबाचे झाड सध्या आजाराने ग्रासले आहे. सदरच्या माऊंट राेडवरील एका झाडाची पाने अशाचप्रकारे सुकायला लागली आहेत. सिव्हिल लाईन्स आणि प्रतापनगर परिसरातही काही सुकत चाललेली झाडे दिसून येत आहेत.
हा ‘डायबॅक’ आजाराचा प्रादुर्भाव
याबाबत कृषी महाविद्यालयाच्या ॲग्राेफाॅरेस्ट्री विभागाचे प्रमुख डाॅ. विजय इलाेरकर यांनी माहिती दिली. ही एक प्रकारची पिकांवर हल्ला करणाऱ्या टाेळधाडीप्रमाणे आहे. काही प्रजातीचे टाेळ विशिष्ट पिकांवर किंवा झाडांवर हल्ला करतात. ‘कि-माॅस्किटाे’ नामक टाेळ केवळ उंच असलेल्या कडुनिंबाच्या झाडावरच हल्ला करते. झाडाची काेवळी पाने खायला सुरुवात करते. या टाेळीच्या हल्ल्यानंतर झाडाला पुढे ‘डायबॅक’ नामक आजाराचा प्रादुर्भाव हाेताे. डायबॅक हा आजार केवळ कडुनिंबाच्या झाडालाच हाेताे. टाेळ टाेकावरची काेवळी पाने खाते व पाने सुकायला लागतात. नंतर खाेडही सुकते व त्यामुळे झाड मृतप्राय हाेऊन जाते. या टाेळीचा लहान किंवा तरुण झाडावर फारसा परिणाम हाेत नाही.
उपाय नसल्याने चिंता
डाॅ. इलाेरकर यांच्या मते कि-माॅस्किटाे टाेळीच्या नियंत्रणासाठी किंवा आजाराचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी सध्यातरी उपाय नाही. त्यामुळे चिंता अधिक आहे. सध्यातरी घरगुती उपाय म्हणून खाली पडलेला सुकलेला पाला जाळून त्याचा धूर करून टाेळीवर नियंत्रण मिळविता येऊ शकते. कृषी महाविद्यालय निरीक्षण करून उपाय करण्याचा प्रयत्न करेल.
दक्षिणेकडे शेकडाे झाडे बळी
कर्नाटक व आंध्रप्रदेशात या आजाराचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. त्याचा प्रकाेप तेलंगणा राज्यापर्यंत पाेहोचला असून या हल्ल्यात कडुनिंबाची शेकडाे झाडे बळी ठरली आहेत. आता हा प्रकाेप महाराष्ट्रातही दिसून येत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही हानीकारक बाब आहे. सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी भावना पर्यावरणप्रेमी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केली.