भारतीय यात्री केंद्र : प्रवाशांच्या समस्यांकडे वेधले लक्षनागपूर : रेल्वे हे प्रवासाचे स्वस्त माध्यम आहे. दररोज नागपुरातून हजारो प्रवासी प्रवास करतात. परंतु पावलोपावली रेल्वे प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागतो. अवैध व्हेंडर, अस्वच्छता, गाडीत टीसीची संख्या कमी, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय, तृतीयपंथीयांचा हैदोस अशा एक ना अनेक समस्यांचा सामना रेल्वे प्रवाशांना करावा लागतो. त्यामुळे भारतीय यात्री केंद्राची स्थापना करून प्रवाशांच्या समस्यांसाठी मागील ३९ वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. रेल्वे प्रवाशांना न्याय देण्यासाठी भारतीय यात्री केंद्राने आजपर्यंत अनेकदा आंदोलने केली. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मत भारतीय यात्री केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत व्यासपीठ’मध्ये व्यक्त केले.‘लोकमत व्यासपीठ’मध्ये चर्चा करण्यासाठी भारतीय यात्री केंद्राचे महासचिव बसंत कुमार शुक्ला, हरीराम गुप्ता, डॉ. जय छांगानी, डॉ. प्रिया छांगानी, रितु बजाज, रत्ना अवस्थी, पूजा नागरे, जगजितसिंग चंडोक, दिलीप फत्तेपुरीया, दिनेश त्रिवेदी, पंकज गुप्ता, सरोज त्रिवेदी, ज्योती अवस्थी उपस्थित होत्या. पूर्वी रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एकही संस्था अस्तित्वात नव्हती. त्यामुळे १९७७ साली भारतीय यात्री केंद्राची स्थापना करण्यात आली. ज्योती अवस्थी यांनी प्रवासात महिलांना अनेक अडचणी येत असून असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्याची गरज असल्याचे सांगितले. गाडीत टीसींची संख्या कमी असल्यामुळे तक्रार करण्यासाठी महिलांजवळ मार्ग उरत नसल्याचे त्यांनी सांगितले. पूजा नागरे यांनी रेल्वे तिकिटाच्या मागे हेल्पलाईन क्रमांक टाकणे गरजेचे असल्याचे सांगितले. रितु बजाज यांनी रेल्वेगाड्यात निकृष्ट भोजन मिळत असून झुरळ तसेच असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करणे महत्त्वाचे असल्याचा उल्लेख केला. पंकज गुप्ता यांनी प्लॅटफार्मवर अस्वच्छता असल्यामुळे प्रवाशांना त्रास होत असल्याची माहिती दिली. दिनेश त्रिवेदी यांनी अवैध व्हेंडर, तृतीयपंथींकडून टीसी वसुली करीत असल्याचे सांगितले. दिलीप फत्तेपुरीया यांनी व्हीआयपी कोट्याचे निकष ठरविण्याची मागणी केली. जगजितसिंग चंडोक यांनी भिकाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कर्मचारी नेमण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ. जय छांगानी यांनी रेल्वेने मागणी केल्यास नि:शुल्क सेवा पुरविण्याचा मानस व्यक्त केला. (प्रतिनिधी)
प्रवाशांच्या समस्या सुटतील काय?
By admin | Published: June 29, 2016 2:59 AM