तीन वर्षांपासून गर्भजल परीक्षण बंद : मेडिकल, डागामध्ये साधे निदानही होत नाही सुमेध वाघमारे नागपूर एकीकडे मृत्यूचे भय तर दुसरीकडे अवहेलना या कात्रीत सिकलसेल रुग्ण सापडला आहे. राज्यातील एकमेव मेडिकलमधील मोफत गर्भजल परीक्षण केंद्र तीन वर्षांपासून बंद आहे. सिकलसेलचे निदान करणारे ‘हाय प्रोफाईल लिक्वीड क्रमोटोग्राफी’ (एचपीएलसी) उपकरणही वर्षभरापासून नादुरुस्त आहे. डागा रुग्णालयात हे उपकरण आहे, परंतु ‘किट’ अभावी बंद पडल्याने रुग्णांची फरफट सुरू आहे. सिकलसेल हा गंभीर आजार आहे. मात्र त्याच्या सोयींबाबत शासन गंभीर नसल्याने रुग्ण अडचणीत आले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सिकलसेल व थॅलेसिमीयाच्या निदानासाठी विकृतीशास्त्र विभागात सहा वर्षांपूर्वी सुमारे १५ लाखांचे ‘एचपीएलसी’ उपकरण घेण्यात आले. वर्षभरापर्यंत ते सुरळीत सुरू होते. हे उपकरण बॅटरीवर चालायचे. परंतु कुणीतरी हे उपकरण थेट विजेवर चालविण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून हे उपकरण नादुरुस्त झाले. विशेष म्हणजे, या उपकरणावर आठवड्यातून २५-३० रुग्णांचे निदान व्हायचे. याच्या एका ‘किट’ला साधारण ९३ हजार रुपये खर्च यायचा. ‘एनआरएचएम’मधून हा निधी मिळायचा. परंतु उपकरण बंद पडल्याने रुग्णांना पदरमोड करून बाहेरून ही महागडी चाचणी करावी लागत आहे. डागा रुग्णालयातही हे उपकरण उपलब्ध आहे. परंतु सहा महिन्यांपासून येथे ‘किट’ उपलब्ध नसल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे. गर्भजल परीक्षणासाठी मुंबईची वारी आयसीएमआर मार्फत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) गर्भजल परिक्षण केंद्र सुरू होते. डॉ. दीप्ती जैन यांच्यावर या प्रकल्पाची जबाबदारी होती. नव्याने गर्भधारणा झालेल्या गरोदर मातांच्या गर्भात वाढणाऱ्या जीवाला अनुवांशिक सिकलसेल आजार जडला आहे, का ही तपासणी या केंद्रात व्हायची. परंतु तीन वर्षांपूर्वी डॉ. जैन यांची अकोला येथे बदली झाली. सोबतच येथील मुख्य तंत्रज्ञ सेवानिवृत्त झाल्याने हे केंद्र बंद पडले. याच काळात हे केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी विकृतीशास्त्र विभागाचे त्यावेळचे विभाग प्रमुख डॉ. दिनकर कुंभलकर यांनी नव्याने काही उपकरणे कार्यान्वित करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला. परंतु शासनाने मेडिकलला डावलत डागा रुग्णालयात हे केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली. मात्र अडीच वर्षांच्यावर कालावधी होत असताना डागामध्ये मुख्य उपकरणाचा पत्ताच नाही. येथे येणाऱ्या रुग्णांना प्रथम ‘मेयो’ आणि नंतर त्यांचे नमुने मुंबईला पाठवावे लागतात. ‘डागा’तील गर्भजल परीक्षण केंद्राला बसणार खीळ! तज्ज्ञाच्या मते, गर्भजल परीक्षण केंद्र चालविण्यासाठी कुशल रेडिओलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ज्ञ व पॅथालॉजिस्टची आवश्यक्त पडते, जे डागा रुग्णालयात उपलब्ध नाही. यामुळे डागाला मुख्य उपकरण मिळाले तरी या केंद्राला खीळ बसण्याची शक्यता आहे. मेडिकलला हे केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार सिकलसेल गर्भजल परीक्षण केंद्र डागामध्ये सुरू झाले तरी तिथे आवश्यक तज्ज्ञाअभावी ते बंद पडण्याची शक्यता अधिक आहे, यापेक्षा ते मेडिकलमध्ये सुरू झाल्यास त्यात खंड पडणार नाही. गर्भजल परीक्षण केंद्र हे मेडिकलमध्येच सुरू करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री व आरोग्य मंत्र्यांशी बोलणार आहे. -डॉ. मिलिंद माने, आमदार
-तर कशी होईल सिकलसेल मुक्ती ?
By admin | Published: August 01, 2016 1:59 AM