अध्यक्ष-उपाध्यक्ष चिंतेत : उलटसुलट चर्चेला उधाणनगपूर : जागा वाटपाच्या तिढ्यावरून शिवसेना-भाजप युतीत घटस्फोट झाल्याने विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षाचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. आरोप-प्रत्यारोपामुळे संबंधात कटुता निर्माण झाल्याने जिल्हा परिषदेतील युतीचे काय होणार, अशी चिंता जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर व उपाध्यक्ष शरद डोणेकर यांना लागली आहे.संख्याबळाचा विचार करता युतीचे बहुमत काठावर आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपतील संबंध ताणले गेल्यास जि.प.तील सत्ता समीकरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत युती अभेद्य राहील, अशी ग्वाही देणारे सेना-भाजपचे नेते आठ दिवसातच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असून आरोप -प्रत्यारोप करीत आहेत.कामठी मतदार संघात भाजपचे चंद्र्रशेखर बावनकुळे यांना शिवसेनेचे तापेश्वर वैद्य यांनी आव्हान दिल्याने मौदा तालुक्यात दोन्ही पक्षाचे नेते व कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. सावरकर बावनकुळे यांच्या तर डोणेकर हे वैद्य यांच्या प्रचाराला लागले आहे. युतीत प्रथमच असा प्रसंग उद्भवला आहे. मौदा तालुक्यातील तलावाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा प्रचार शिवसेना नेत्यांनी चालविला आहे. सावरकर व डोणेकर यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. परंतु डोणेकर यांच्याकडे तूर्त कोणतीही समिती नाही. डोणेकर यांनी समिती वाटपापूर्वीच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेण्याच्या प्रकारावर भाजपच्या काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान राजकीय घडामोडीत राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांना सभापतिपद देऊन बांधकाम खाते देण्याला भाजपच्याही काही सदस्यांनी सहमती दिल्याची चर्चा आहे. सत्तेत राष्ट्रवादी सहभागी न झाल्यास बांधकाम समिती भाजपकडे राहावी, असा पक्ष सदस्यांचा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)
जि.प.तील युतीचे काय होणार?
By admin | Published: September 29, 2014 1:01 AM