नागपूर/मुंबई - मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी सरकारने सारथी ही संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. त्याच अनुषंगाने आमदार सतेज पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिप्रश्न केला आणि, पीएचडी करुन पोरं काय दिवे लावणार आहेत? असा सवाल केला. अजित पवारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पीएचडीधारक विद्यार्थ्यांची नाराजीही दिसून येत आहे.
सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. यातच पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्तीसुद्धा दिली जाते. मात्र, ती केवळ २०० विद्यार्थ्यांना दिली जाते. ही संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली. त्यासंदर्भात, अजित पवारांनी उत्तर दिलं होतं. राज्यात होत असलेल्या पीएचडींपैकी खरंच किती पीएचडींची आपल्याला गरज आहे? संख्या वाढवून काय करणार? पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार? असं अजित पवार म्हणाले. विशेष म्हणजे अजित पवारांच्या विधानावर सभागृहातील काही प्रमाणात हशा पिकल्याचं ऐकायलं मिळालं.
अजित पवार म्हणाले, ''अनेक ठिकाणी सारथी, महाज्योती आणि बार्टी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या संस्था आहेत. या संस्थांमध्ये आम्हाला फेलोशीप, पीएचडीसाठी शिष्यवृत्ती द्या, प्रवेश द्या, निधी द्या, अशा मागण्या होत आहेत. मात्र, ही संख्या एवढी वाढली की, एवढ्या मुलांची पीएचडी खरंच गरजेची आहे का, अशी चर्चा कॅबिनेटमध्ये झाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. कॅबिनेटमधील चर्चेनंतर आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमायची आणि त्यांनी या समितीन निर्णय घ्यायचा. त्यानुसार, पीएचडीसाठी सारथीला २०० विद्यार्थ्यांची संख्या तर परदेशी शिष्यवृत्तीसाठी ७५ विद्यार्थ्यांची संख्या असेल, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.
काय दिवे लावणार?
दरम्यान, यावेळी फेलोशीपसाठी विद्यार्थी संख्या २०० केल्यावर आक्षेप घेत आमदार सतेज पाटील यांनी हा निर्णय पुढच्या वर्षापासून लागू करावा. कारण, या फेलोशीपसाठी १३२९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता, ते सर्वजण फेलोशीपच्या आशेवर आहेत, असे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर, अजित पवार यांनी, फेलोशील करुन ते काय करणार आहेत? असा सवाल केला. त्यावर, फेलोशीप घेऊन ते विद्यार्थी पीएचडी करतील असेही पाटील यांनी म्हटले. त्यावर, अजित पवार यांनी रोखठोक प्रतिप्रश्न केला आणि पीएचडी करुन काय दिवा लावणार आहेत, असा सवाल केला.