लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : तालुक्यात चालू रबी हंगामात एकूण ६,४५३ हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी करण्यात आली. अनुकूल वातावरणामुळे काही शिवारातील गव्हाचे पीक कापणीला आले असून, काही शिवारातील पीक पक्व हाेत आहे. संपूर्ण तालुक्यातील गव्हाचे पीक जाेमदार असल्याने यावर्षी गव्हाचे समाधानकारक उत्पादन हाेण्याची आशा पल्लवीत झाली आहे.
यावर्षी परतीचा पाऊस रेंगाळल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी थाेडी उशिरा केली. त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने थाेडेफार नुकसानही झाले. मात्र, काही अपवाद वगळता संपूर्ण हंगामभर अनुकूल वातावरण मिळाल्याने गव्हाच्या पिकाची जाेमात वाढ झाली. तालुक्यातील काही शिवारात गव्हाच्या पिकाच्या कापणीला सुरुवात झाली असून, काही शिवारातील पीक कापणीला आले आहे तर काही शिवारातील पीक पक्व हाेत आहे.
आपण यावर्षी आठ एकरात गव्हाची परेणी केली असून, डिसेंबर व जानेवारीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकाचे थाेडेफार नुकसान झाले. सध्या पिकाची अवस्था चांगली असल्याची माहिती रनाळा (ता. कामठी) येथील शेतकरी लोडबा ठाकरे यांनी दिली. संपूर्ण पीक समाधानकारक असल्याने गव्हाचे चांगले उत्पादन हाेण्याची आशा लाेडबा ठाकरे यांच्यासह नेरी (ता. कामठी) येथील डुमदेव नाटकर या शेतकऱ्याने व्यक्त केली.