लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : शेतातील गव्हाच्या गंजीला अचानक आग आगल्याने अंदाजे २० क्विंटल गहू जळून खाक झाला. त्यात शेतकऱ्याचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना नरखेड तालुक्यातील भिष्णूर येथे रविवारी (दि.१४) दुपारच्या सुमारास घडली. गेल्या आठवडाभरात भिष्णूर येथे आगीची ही दुसरी घटना आहे. शाॅर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली असावी, असा प्रथमदर्शनी अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
भिष्णूर येथील शेतकरी सुभाष केशव वंजारी यांची गावालगत शेती असून, नुकतीच त्यांनी गव्हाची कापणी करून शेतात गंजी लावून ठेवली हाेती. दरम्यान, रविवारी अचानक गंजीला आग लागल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, तसेच नरखेड येथील अग्निशमन पथकाला सूचना देण्यात आली. अग्निशमन पथक दाखल हाेईपर्यंत संपूर्ण गहू जळून खाक झाला हाेता. आगीच्या घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर यांनी घटनास्थळी पाहणी केली व संबंधित विभागाला पंचनामा करण्याचे निर्देश दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास आर्थिक मदत मिळण्याबाबत पाठपुरावा केला जाईल, असे सभापती नीलिमा रेवतकर यांनी सांगितले.