लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहर पोलीस दलात दाखल झालेल्या सेल्फ बलेन्सिंग स्कूटरचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ताबा घेतला आणि पुढच्या काही क्षणातच सेल्फ बॅलेंसिंग स्कूटर अनबलेन्स झाली. त्यामुळे काही क्षणासाठी पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. पोलीस दलाकडून नागपूर पोलिसांना १० सेल्फ बॅलेंसिंग स्कूटर देण्यात आल्या आहेत. शहर पोलीस दलात या स्कूटर्स दाखल झाल्या. त्या प्रत्यक्ष सेवेत रुजू करून घेण्याचा सोहळा शनिवारी पोलीस जिमखान्यात पार पडला. या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. स्कुटरचा बॅलेंस दाखवत गृहमंत्र्यांना पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सलामी दिली. अतिशय आकर्षक दिसणाऱ्या या स्कूटरची ट्रायल घेण्याचा मोह गृहमंत्री देशमुख यांना आवरला नाही. त्यामुळे त्यांनी बॅलेंसिंग स्कूटरचा ताबा घेतला. मात्र ताबा घेतल्याच्या पुढच्या काही सेकंदातच स्कूटर अनबॅलन्स झाली. ती हलत असल्यामुळे गृहमंत्रीही हलू लागले. ते पाहून पोलिसांची भमबेरी उडाली. लगेच बाजूच्या पोलीस अधिकाऱ्यांनी स्कूटरला बॅलन्स केले आणि गृहमंत्री खाली उतरले.
गृहमंत्र्यांच्या ताब्यातील बॅलेंसिंग स्कूटर अनबॅलेन्स होते तेव्हा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 9:39 PM