खापा : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत केली जाते. यंदा १४ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. या मदतीचा पहिल्या टप्प्यातील रक्कम बँकेत जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. यानुसार खापा (ता. सावनेर) परिसरातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. मात्र, काही शेतकरी अद्याप या योजनेपासून वंचित आहेत. योजनेतील पहिल्या टप्प्यातील दोन हजार रुपयांची रक्कम अद्याप जमा झाली नसल्याने शेतकरी तहसील कार्यालय व बँकेच्या चकरा घालत आहेत. तहसील कार्यालयात गेल्यावर अधिकारी बँकेत जाऊन चौकशी करा, असे सांगतात. इकडे बँकेत गेल्यावर तहसील कार्यालयात विचारणा करा, असे सांगितले जाते. सध्या खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांची बी - बियाण्यांसाठी जुळवाजुळव सुरू आहे. अशात किती दिवस तहसील कार्यालय आणि बँकेच्या चकरा माराव्यात, असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:07 AM