नागपूर : बारावीची परीक्षा म्हटली की विद्यार्थी अगोदरच तणावात असतात. त्यात पेपर सुरू असताना परीक्षा केंद्रात विषारी साप ‘कोब्रा’ शिरला तर... तणावाची पातळी कुठपर्यंत जाईल याचा विचारही करवत नाही ना! लकडगंज परिसरातील अन्नपूर्णा देशमुख कनिष्ठ महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना असाच अनुभव आला. परीक्षा केंद्रावर हिंदी विषयाचा पेपर होता. या केंद्रावर २८१ विद्यार्थी उपस्थित होते. पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच गॅलरीमध्ये परीक्षेच्या कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना ‘कोब्रा’ दिसला. विषारी फुत्कार सोडणाऱ्या ‘कोब्रा’ला पाहून त्यांची बोबडीच वळली. येथे परीक्षा सुरू आहे असे ‘कोब्रा’ला कळले की काय कुणास ठाऊक. त्याने एखाद्या वर्गखोलीत जाण्याऐवजी कोणीच नसलेल्या संगणक खोलीकडे मोर्चा वळविला. एव्हाना परीक्षा केंद्रावर कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली होती. प्रसंगावधान राखून सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले व काही वेळातच या ‘कोब्रा’ला परीक्षा केंद्राच्या बाहेर नेण्यात यश आले. दरम्यान, बहुतांश विद्यार्थ्यांना ‘कोब्रा’ आला असल्याचे पेपर झाल्यानंतरच कळाले. मोठ्या संकटातून सुटका झाली हे कळताच सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. यामुळे पेपरमध्ये कुठलाही व्यत्यय आला नसल्याची माहिती येथील अतिरिक्त केंद्र संचालक सुनील सुभेदार यांनी दिली.(प्रतिनिधी)
परीक्षा केंद्रातच ‘कोब्रा’ निघतो तेव्हा...
By admin | Published: February 25, 2015 2:46 AM