रमानगरात वाहतुकीची कोंडी : फाटक ओलांडताना चिमुकल्यांचा जीव धोक्यात कामठी : स्थानिक रमानगरात असलेले रेल्वे फाटक तासन्तास बंद असते. त्यामुळे फाटकाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागतात. अशावेळी शाळेला उशीर होऊ नये म्हणून चिमुकले त्यांच्या पालकांसोबत फाटकाच्या खालून रेल्वे लाईन ओलांडतात. या जीवघेण्या प्रकाराला आळा घालण्यासाठी तसेच वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी या ठिकाणी रेल्वे ‘फ्लायओव्हर’चे बांधकाम करणे आवश्यक आहे.नागपूर-हावडा ही रेल्वे लाईन कामठीहून जाते. कामठी शहरातील रमानगरात या रेल्वे लाईनवर फाटक तयार करण्यात आले आहे. या रेल्वे लाईनवरून हावडा व नागपूरकडे धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या अधिक असल्याने, सदर फाटक वारंवार बंद केले जाते. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना रेल्वे जाईपर्यंत ताटकळत उभे राहावे लागते.सदर रेल्वे फाटक कामठी-घोरपड-महालगाव मार्गावर असून, या फाटकाच्या अलीकडे कामठी शहर आणि पलीकडे घोरपड, लिहीगाव, महालगाव, शिरपूर, पवनगाव आदी गावे तसेच रविदासनगर, यशोदरानगर आदी नागरी वसाहती आहेत. तसेच या मार्गावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), अभियांत्रिकी महाविद्यालय, पॉलिटेक्निक कॉॅलेज, फार्मसी कॉलेज, शारीरिक शिक्षण महाविद्यालय यासह अन्य शैक्षणिक संस्थादेखील आहेत. त्यामुळे या मार्गावरून विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असते. तालुक्यातील घोरपड, लिहीगाव, महालगाव, पवनगाव यासह अन्य गावातील नागरिक याच मार्गाने कामठीला येत असून, शेतीमालाची वाहतूकही याच मार्गाने करतात. त्यांना कामठीला येण्यासाठी या मार्गाशिवाय दुसरा सोईचा मार्ग नाही. कामठी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने कामठीत पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, खासगी हॉस्पिटलसह अन्य शासकीय कार्यालये तसेच बाजारपेठ असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना कोणत्या ना कोणत्या कामासाठी कामठीला यावे लागते.कामठी-महालगाव मार्गावर नवीन नागरी वस्त्या तयार होत आहेत. त्यामुुळे भविष्यात ही समस्या आधी उग्र रूप धारण करणार आहे. येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी येथे रेल्वे फ्लायओव्हर तयार करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, ही मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याने, ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. (तालुका प्रतिनिधी)
रेल्वे ‘फ्लायओव्हर’ बांधणार कधी?
By admin | Published: December 28, 2014 12:39 AM