अडतियांचे मनपाकडे ८ कोटी जमा, जनरल मार्केट शिकस्त : योजनेसाठी ९० कोटी मंजूरनागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागातील महात्मा फुले बाजारपेठ मनपाच्या जवळपास १४ एकर जागेवर असून येथील व्यापाऱ्यांकडून कर आकारणीनंतरही विकास शून्य आहे. बाजाराच्या मागील भागात भाज्यांचा ठोक बाजार भरतो. हा बाजार नागरिकांच्या आरोग्याशी निगडित आहे. या परिसराची स्वच्छता कागदोपत्रीच आहे. एक दिवसाआड साफसफाई केली जात नाही. बाजारात विजेची व्यवस्था नाही, मूत्रीघर नाही, शिवाय नाल्या तुंबल्या आहेत. मनपाने याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. या बाजाराच्या माध्यमातून शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या जागेवर व्यापारी संकुल उभारून अडतिया आणि विक्रेत्यांना दुकाने आणि सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची त्यांची अनेक वर्षांपासून मागणी आहे. संकुल उभारण्याचे आश्वासन सर्वच पक्षांच्या नेत्यांनी दिले आहे. पण त्यांची आश्वासने ही आश्वासनेच ठरली आहेत. अडतिये पूर्ण होण्याची वाट पाहात असून मुहूर्ताच्या तारखेवर त्यांच्या नजरा आहेत. मुख्यमंत्र्यांना बाजाराची संपूर्ण माहितीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्वी नागपूरचे महापौर होते. त्याचवेळी बाजाराचे अडतिया विठ्ठल भेदे हे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. फडणवीस यांनी भेदे यांच्यासोबत अनेकदा बाजाराला भेट दिली आहे. त्यांना बाजाराच्या समस्यांची पूर्ण जाण आहे. त्यावेळी त्यांनी बाजाराचे बांधकाम करण्याचे आश्वासन दिले होते. आता संकुल उभारणीसाठी राज्य सरकार किंवा हायकोर्टाचा अडथळा नाही. जागा मनपाची असल्यामुळे बांधकाम तेच करतील. मनपाला कुठलीही गुंतवणूक न करता अडतिया आणि लोकांकडून रक्कम घेऊन बाजाराचे बांधकाम करायचे आहे. या जागेवर अद्ययावत मार्केट बांधण्याची गरज आहे. पूर्वी हा बाजार गजबजलेला होता. विदर्भासह मध्य प्रदेशातील व्यापारी या बाजारावर अवलंबून होते. वाढत्या लोकसंख्येनुसार हा बाजार नागपूर शहराची गरज पूर्ण करतो. त्यानंतरही या बाजाराच्या अत्याधुनिकीकरणाकडे मनपाने दुर्लक्ष करू नये, असे महात्मा फुले भाजी बाजारातील अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. बाजाराचे बांधकाम केव्हा होणार?बाजाराचे अद्ययावत बांधकाम हीच मोठी समस्या बनली आहे. या जागेवर व्यापार संकुल उभारण्याची संकल्पना २००४ मध्ये पुढे आली. त्यावेळी मनपाने येथील २८० पेक्षा जास्त आडतियांसह एकूण ८०० जणांकडून प्रत्येकी १०,५०० रुपये असे एकूण ८.४० कोटी रुपये घेतले होते. त्यावेळी येथील किरकोळ भाजी विक्रेत्यांना विचारात न घेतल्याने त्यांनी विरोध केला होता. मनपाचे तत्कालिन आयुक्त चंद्रशेखर यांनी बाजाराच्या सर्वेक्षणावर १३ ते १४ लाख रुपये खर्च केले होते. नागरिकांना हायजेनिक भाजीपाला मिळावा, असा या मागील उद्देश होता. व्यापार संकुल बांधण्याचा प्रस्ताव मनपाने तीन वर्षांपूर्वी सभागृहात पारित केला होता. त्यासाठी ९० कोटी रुपये मंजूर केले होते. पण माशी कुठे शिंकली हे कळलेच नाही. व्यापार संकुलाचा प्रस्ताव मागे पडला. तो केव्हा होणार, हा गंभीर सवाल असल्याचे महाजन म्हणाले.महात्मा फुले जनरल मार्केट धोकादायकमहात्मा फुले बाजारात असलेला जनरल बाजार सध्या शिकस्त आहे. तो केव्हाही पडू शकते, अशा स्थितीत आहे. त्याची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी मनपाची आहे. पण त्याकडेही मनपाने दुर्लक्ष केले आहे. मोठा अपघात झाल्यानंतर मनपाला जाग येईल, असा आरोप महाजन यांनी केला. पूर्वी भाजी मार्केट बांधून सर्वात खाली पार्किग आणि वरच्या माळ्यावर भाज्यांची दुकाने आणण्याचा प्रस्ताव होता. जनरल बाजारातील दुकानदारांना त्यावरील माळ्यावर आणून नवीन बाजार बांधण्याची योजना होती. पण पुढे प्लॅन तयार झालाच नाही. ३० हजारांपेक्षा जास्त लोकांना अप्रत्यक्ष रोजगारशहरातील मॉडेल आणि एम्प्रेस मिल बंद झाल्यानंतर बेरोजगार झालेल्या लोकांना या भाजी बाजाराने आश्रय दिला. अनेकांनी भाज्यांची विक्री करून उदरनिर्वाह सुरू केला. या बाजारावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जवळपास ३० हजार लोक अवलंबून आहेत. अशा स्थितीत बाजाराचे आधुनिकीकरण करणे अत्यावश्यक आहे. जवळपास आठ एकर जागेवर मोठे व्यापार संकुल उभे राहू शकते. त्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळू शकतो. मनपाचे तत्काालिन आयुक्त श्याम वर्धने यांना हायकोर्टाने व्यापार संकुल उभारण्याचे निर्देश दिले होते. मनपाने वेळोवेळी संकुल उभारण्याचे आश्वासन देऊन आडतियांची फसवणूक केल्याचा आरोप महाजन यांनी केला.खासदाराच्या फंडातून रस्त्यांचे बांधकामतीन ते चार वर्षांपूर्वी पावसाळ्यात चिखलातून मार्ग काढत ग्राहकांना भाज्यांची खरेदी करावी लागत होती. मनपाकडे रस्ते बांधून देण्याची अनेकदा विनंती केली. पण ती फेटाळून लावली. खासदारांना रस्ते बांधकामाची विनंती करण्यात आली. त्यांनी रस्ते बांधण्यासाठी खासदार फंडातून ५० लाख दिले. या फंडातून रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे आता बाजारात चिखल होत नाही, शिवाय ग्राहकांना सहजरीत्या भाज्यांची खरेदी करता येते.
मोकाट जनावरांचा हैदोसपाऊस सुरू होण्यापूर्वीच बाजारात मोकाट जनावरांचा हैदोस वाढला आहे. मनपा प्रशासन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात कमी पडल्याने या बाजाराची समस्या अधिक गंभीर बनली आहे. शहरात मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविली जात असल्याचा दावा मनपाचे अधिकारी करीत असले तरी बाजारात मात्र जनावरांचा सुळसुळाट दिसून येत आहे. जनावरांमुळे सुटणारी दुर्गंधी ही डोकेदुखी आहे. याशिवाय बाजाराच्या सभोवताल मोकाट जनावरांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. ही बाब वाहनचालकांच्या डोकेदुखीत भर घालणारी ठरली आहे. योग्य ती कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस मोकाट जनावरांचा त्रास वाढत आहे. मनपा प्रशासनाची तात्पुरती यंत्रणा हलते. मात्र, नंतर पुन्हा स्थिती ‘जैसे थे’ होते. मनपाने जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी महाजन यांनी केली.