भाजप नेत्यांचा सूर : जिल्हा बँकेचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तांत्रिक कारणांमुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर प्रतिबंध घातला. याला आ. सुनील केदार यांच्यासोबतच बँकेचे त्यांच्या मर्जीतील संचालक मंडळ जबाबदार आहे. शासनानेही सुरुवातीला या गंभीर समस्येकडे डोळेझाक केली. परिणामी, या बँकेची अवस्था आज भूविकास बँकेसारखी झाली आहे. ही बँक बंद पडल्याने नागपूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांवर पीककर्ज मिळविण्यासाठी दारोदार भटकण्याची वेळ आली. त्यामुळे राज्य शासनाने आ. सुनील केदार यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्याची निरपेक्ष चौकशी करावी, त्यात आ. सुनील केदार यांच्यासह दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा प्रतिक्रिया ग्रामीण भागातील भाजपच्या नेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या. शिवाय, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राज्य शासनाने या बँकेचे पुनरुज्जीवन करण्याची मागणीही या नेत्यांनी केली. कठोर शिक्षा व्हावी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ७५ टक्के खातेदार हे शेतकरी आहेत. घोटाळ्यामुळे बंद पडलेली बँक नावाला सुरू आहे. शेतकऱ्यांना त्यांचा पैसा परत मिळत नाही. ही बँक शेतकऱ्यांची बँक म्हणूनच ओळखली जायची. अनेकांच्या मुलींचे लग्न बँकेत पैसा अडकून पडल्यामुळे अडचणीत आले आहेत. या बँकेतील घोटाळ्याची योग्य चौकशी व्हायला पाहिजे. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. - दिलीप देशमुख, नगराध्यक्ष तथा भाजप नेते, रामटेक. खातेदारांचा विश्वास उडाला आर्थिक घोटाळ्यामुळे खातेदारांचा जिल्हा बँकेवरील विश्वास उडाला. या प्रकरणात सर्वाधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आता कुणीही या बँकेसोबत व्यवहार करण्याची हिंमत करीत नाही. बँकेला ग्राहकांना नव्याने विश्वास संपादन करणे अवघड नसल्याने शासनाने ही बँक नव्याने सुरू करावी. - नरेश मोटघरे, सचिव, भाजप, मौदा. बँकेचे पुनरुज्जीवन करा आ. सुनील केदार यांच्या नेतृत्वातील संचालकांनी जिल्हा बँकेतील सामान्यांच्या ठेवीवर डल्ला मारला. त्यामुळे शेतक ऱ्यांचा आत्मा असलेली ही बँक बुडाली. चार वर्षांपासून पीककर्ज मिळविण्यासाठी शेतक ऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. वेळीच पीककर्ज न मिळाल्याने काहींनी मृत्यूला जवळ केले. त्यामुळे या घोटाळ्यात सहभागी असलेल्यांवर तत्काळ कारवाई करावी तसेच शासनाने जिल्हा बँकेचे पुनरुज्जीवन करावे. - डिमेश तिमांडे, भाजप पदाधिकारी, भिवापूर स्वार्थासाठी बँकेचा वापर जिल्हा बँकेतील आर्थिक घोटाळ्याला आ. सुनील केदार जबाबदार आहेत. त्यांनी या बँकेचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी केला. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचेच पैसे मिळविण्यासाठी बँकेचे उंबरठे झिजवावे लागत आहे. सुनील केदार यांनी या घोटाळ्यातून जिल्ह्यातील हजारो शेतकरी आणि खातेदारांची फसवणूक केली आहे. - गुणवंता लांजेवार, भाजप, कार्यकर्ता, कुही. ही बँक शाप ठरली एकेकाळी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक घोटाळ्यामुळे शाप ठरली आहे. बाबासाहेब केदार यांनी सहकारातून अनेकांना घडविले, रोजगार मिळवून दिला. सुनील केदार यांनी मात्र वाटोळे केले. या बँकेतील घोटाळ्यास सुनील केदार सर्वस्वी जबाबदार असल्याने घोटाळ्याची संपूर्ण रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी तसेच भविष्यात असे घोटाळे होणार नाही, यासाठी कठोर शिक्षा द्यावी. - शामराव बारई, तालुकाध्यक्ष, भाजप, नरखेड. कारवाईला दिरंगाई नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळा निंदनीय आहे. यात नेमके कुणाचे फावले, हे सर्वश्रुत आहे. गरीब शेतकरी आधीच कर्जबाजारी आहेत. त्यातही अनेकांच्या या बँकेत ठेवी अडकल्या. त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. कारवाईला उशीर होत असून, शासनाने यावर तातडीने उपाययोजना केली पाहिजे. - डॉ. शिरीष मेश्राम, राष्ट्रीय परिषद सदस्य, भाजप, उमरेड शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ या बँकेत शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे जमा होते. बँक बंद पडल्याने त्यांना त्यांचेच पैसे दिले जात नाही. त्यामुळे अनेकांना सावकारांकडे हात पसरावा लागला तर काहींना आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या करावी लागली. त्यामुळे या घोटाळ्याची चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी. - छाया येरखेडे, तालुकाध्यक्ष, भाजप महिला आघाडी, पारशिवनी. खातेदारांची फसवणूक जिल्हा बँक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरली होती. आ. सुनील केदार यांनी आर्थिक घोटाळा करून संपूर्ण शेतकरी, कर्मचारी व इतर खातेदारांची फसवणूक केली. सरकारने या प्रकरणाची निरपेक्ष चौकशी करावी आणि त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी. - विजय महाजन, भाजप, पदाधिकारी, काटोल. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बंद पडल्याने शेतकरी व ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बँकेचे आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ही बँक सुरू करावी तसेच दोषींवर कारवाई करावी. - इमेश्वर यावलकर, भाजप, तालुकाध्यक्ष, कळमेश्वर. शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला आ. सुनील केदार यांनी जिल्हा बँकेत आर्थिक घोटाळा करून ग्रामीण भागातील हजारो शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारला आहे. त्यामुळे या प्रकरणाची निरपेक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. - रेखा दुनेदार, महामंत्री भाजप महिला आघाडी, पारशिवनी.
सुनील केदारांवर कारवाई कधी?
By admin | Published: May 15, 2017 2:22 AM