नरखेड : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर सर्व काही अनलॉक झाले आहे. मात्र पॅसेंजर रेल्वेगाड्या अद्यापही लॉकच आहेत. नरखेड रेल्वे स्टेशनला जंक्शनचा दर्जा आहे. लॉकडाऊनपूर्वी ४० पॅसेंजर व एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांचे नरखेडला थांबे होते. अठरा महिन्यांपूर्वी लॉकडाऊन घोषित झाल्यापासून एकही एक्स्प्रेसचा थांबा नाही. तसेच बेरोजगार व प्रवाशांची लाइफलाइन असलेली पॅसेंजरही अजूनपर्यंत सुरू न झाल्यामुळे स्थानिक प्रवाशांना आर्थिक भुर्दंडासह विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
देशातील प्रसिद्ध संत्रा बाजारपेठ म्हणून नरखेडची ओळख आहे. त्यामुळे दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, काचिगुडा, कोल्हापूर, जयपूर, इंदूर, उज्जैन, यशवंतपूर, एर्नाकुलम, भुसावळ, रायगड येथे प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. तसेच नरखेड व परिसरातील हजारो प्रवासी पॅसेंजर गाडीने रोजगार व कामानिमित्त दररोज नागपूर, अमरावती, मध्य प्रदेशातील आमला, इटारसी येथे अप-डाऊन करीत असतात. अठरा महिन्यांपासून पॅसेंजर बंद असल्यामुळे बसने प्रवास करावा लागतो. त्यामुळे दैनिक प्रवाशांवर आर्थिक भुर्दंड बसत असून, त्यांचा वेळेचाही अपव्यय होत आहे. एस.टी. बसेस सुरू असून, त्याची तिकिटे पॅसेंजर गाडीच्या तुलनेत सहा-सात पट जास्त आहेत. तिकिटाच्या आर्थिक भुर्दंडामुळे कित्येकांनी आपला रोजगार सोडलेला आहे. त्यामुळे परिसरात बेरोजगारांची संख्या वाढली आहे.
नरखेड रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या जी.टी., दक्षिण, जबलपूर, इंदूर, दीक्षाभूमी, गोंडवाना इत्यादी अनेक एक्स्प्रेस गाड्या सुरू आहेत. परंतु पूर्वी थांबा असलेल्या एकही एक्स्प्रेला सध्या नरखेड स्थानकावर थांबा नसल्यामुळे दूर पल्ल्याच्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यांना प्रवासाकरिता नागपूर किंवा मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. नरखेड हे जंक्शन असून, येथे सर्व एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे पूर्ववत करावे. तसेच पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात याव्या, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
---
नरखेड स्थानकावर पूर्वी थांबा असलेल्या गाड्या
नरखेड - अकोला काचीगुडा एक्स्प्रेस, नागपूर रिवा एक्स्प्रेस, दादाधाम एक्स्प्रेस, दीक्षाभूमी एक्स्प्रेस, एर्नाकुलम-राजेंद्रनगर एक्स्प्रेस, दक्षिण एक्स्प्रेस, सिकंदराबाद-जयपूर एक्स्प्रेस, नागपूर-जयपूर एक्स्प्रेस, जी. टी. एक्स्प्रेस, गोंडवाना एक्स्प्रेस, यशवंतपूर-इंदूर एक्स्प्रेस, त्रिशताब्दी एक्स्प्रेस, अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस, छत्तीसगड एक्स्प्रेस, नरखेड-भुसावळ पॅसेंजर, नागपूर-ईटारसी पॅसेंजर, नरखेड-नई अमरावती पॅसेंजर, नागपूर-आमला पॅसेंजर या अप व डाऊन गाड्यांचा समावेश आहे.
----–----
नरखेड येथून नागपूरला रोजगार व कामाकरिता हजारो प्रवासी पॅसेंजरने प्रवास करतात. त्याकरिता रेल्वेकडून मासिक पास दिला जात होता. गेल्या वर्षभरापासून रोजगाराकरिता नागपूरला जाणाऱ्यांना खासगी वाहन किंवा बसशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यामुळे कित्येकांनी रोजगारच सोडून दिला आहे. कोरोनाची लाट ओसरली असून, प्रवाशांच्या सोयीकरिता रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर गाड्या सुरू करून नरखेड स्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा पूर्ववत करावा.
प्रा. अनिल भुजाडे
उपाध्यक्ष, नरखेड प्रवासी मंडळ.