रामटेक गडमंदिराचे अडीच कोटी कधी देता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 01:58 PM2018-02-02T13:58:40+5:302018-02-02T14:01:08+5:30
रामटेक येथील गडमंदिराच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने ७ कोटी रुपये मंजूर केले असून त्यापैकी अडीच कोटी रुपये देणे बाकी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही रक्कम कधीपर्यंत अदा करता, अशी विचारणा शासनाला केली आहे. तसेच, यावर तीन आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेक येथील गडमंदिराच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने ७ कोटी रुपये मंजूर केले असून त्यापैकी अडीच कोटी रुपये देणे बाकी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही रक्कम कधीपर्यंत अदा करता, अशी विचारणा शासनाला केली आहे. तसेच, यावर तीन आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.
यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार विकासकामांच्या प्रगतीवर प्रतिज्ञापत्र सादर करून गडदुरुस्तीचे काम एक वर्षात पूर्ण करण्याची ग्वाही दिली. श्रीराम व लक्ष्मण मंदिराच्या पश्चिम भागाकडील गड ढासळत आहे. त्यामुळे मंदिराला धोका निर्माण झाला आहे. परिणामी, हा गड तात्काळ दुरुस्त करणे आवश्यक झाले आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. तसेच, काम कठीण असल्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. याप्रकरणात वरिष्ठ वकील आनंद जयस्वाल न्यायालय मित्र असून शासनातर्फे अॅड. दीपक ठाकरे तर, रामटेक नगर परिषदेतर्फे अॅड. महेश धात्रक यांनी बाजू मांडली.