प्रवीण राय / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डबलडेकर उड्डाणपुलावरून जड वाहनांना परवानगी नसतानाही, पुलावर जेव्हा २०-२० चक्का चढला आणि त्यानंतर झालेल्या आवाजाने अनेकांचा थरकाप उडाला.
गुरुवारी रात्री १२.३० वाजता या घटनेचा साक्षात्कार अनेकांनी घेतला. यावेळी अजनी चौकात मोठमोठे ट्रेलर आणि कंटेनर एकापाठोपाठ उभे होते. पुढे अपघात झाल्याने हे कंटेनर येथे उभे असतील, असा संशय सर्वसामान्यांचा झाला. पुढे गेल्यावर साईमंदिर जवळ वर्धारोडवरील डबल डेकर पुलाजवळ २०-२० चक्का कंटेनर उभे होते. डबल डेकर पुलावर चढावे की नाही, या संभ्रमावस्थेमुळे ते उभे असल्याचा संशय येत होता. मात्र, थोड्याच वेळात २५ ते ३० कंटेनर पुलावर एकसाथ चढताना दिसले. एकाच वेळी एवढे मोठे जड वाहन पुलावरून जाताना, अनेकांची घाबरगुंडीच उडाली. त्यामुळे, अनेकांनी स्वत:चे वाहन थांबवून कंटेनर्सला पुढे जाऊ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, जेव्हा हे कंटेनर्स जात होते, तेव्हा पुलाला प्रचंड कंपन निर्माण झाले. या कंपनांमुळे पुलावर वाहन उभे करून थांबलेल्या नागरिकांचा थरकाप उडाला. कंटेनर्सचा वेग वाढल्याने कंपनही वाढत होते. अनेकांना पूल तुटून पडण्याची भीती वाटत होती. या संदर्भात शुक्रवारी महामेट्रोचे डीजीएम (काॅर्पोरेट कम्युनिकेशन) अखिलेश हळवे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. तेव्हा त्यांनी डबलडेकर पूल अतिशय मजबूत असल्याचे सांगितले. पुलावरून जड वाहनांना जाण्यास निर्बंध नसल्याचेही ते म्हणाले. मात्र, एका वेळी किती वजन पुलावरून जाऊ शकते, याबाबत त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही.
--------
बॉक्स...
जड वाहनांना निर्बंध घालण्याची जबाबदारी पोलिसांची
जड वाहन शहरात शिरू नये, याकडे शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे हळवे म्हणाले. डबलडेकरवरून जड वाहनांना कुठलेच प्रतिबंध नाही. म्हणूनच पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिअर लावण्यात आलेले नाहीत. शंभर टन क्षमतेचे वाहन आरामात जाऊ शकेल, असेच डिझाईन डबलडेकर ब्रिजचे करण्यात आल्याचे हळवे यांनी सांगितले.
............