लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास नेहमीप्रमाणे गोरेवाडा जलशुद्धीकरण केंद्रात कर्मचाऱ्यांची लगबग सुरू असते. पंपिंग व्हॉल्व ऑपरेट करणे, पाणी नमुने तपासणी, विद्युत पुरवठा संयत्राची तपासणी करून असताना अचानक धोक्याचा सायरन (घंटी) वाजतो. कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होते. एका महत्त्वाच्या विद्युत संचातून धूर निघतो, लगेच पंपिंग बंद पडते. क्षणातच धुराच्या ठिकाणी आगीने भडका घेतलेला असतो. सायरन वाजताच जलशुद्धीकरण केंद्रात कार्यरत असलेली फायर फायटरची चमू आगीच्या ठिकाणी पोहचते. अवघ्या १ मिनिट १६ सेकंदात आगीवर नियंत्रण आणून केंद्रातील पंपिंग पुन्हा सुरू केले जाते.ओसीडब्ल्यूच्या सुरक्षा मॉक ड्रील दरम्यान हा थरार बघायला मिळाला. सुरक्षेच्या दृष्टीने जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणा सदैव सज्ज असावी, यासाठी ओसीडब्ल्यू वर्षभरात चारवेळा अशा प्रकारची मॉक ड्रील घेत असते.जलशुद्धीकरण केंद्रात काही दुर्घटना घडल्यास पंपिंग बंद पडू शकते आणि शहराचा पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सज्ज असणे गरजेचे आहे. गोरेवाडा जलशुद्धीकरण केंद्रात आग नियंत्रणात आणणारे ४४ संयंत्र मोक्याच्या ठिकाणी लावण्यात आले आहे. तसेच येथे चार फायटरची चमू तैनात असते. मुख्य प्रबंधक प्रवेन शरण, प्रबंधक दिलीप ठाकरे यांच्या मार्गदर्शनात ही मॉक ड्रील घेण्यात आली. १६ ते २१ सप्टेंबर दरम्यान सर्व जलशुद्धीकरण केंद्र तसेच झोन कार्यालय आणि प्रोजेक्ट कामकाज क्षेत्रात ‘सुरक्षा आणि आरोग्य आठवडा’ राबविला जात आहे.