जिल्हा परिषद : जिल्ह्यातील ९६२ घरकूलांचे काम अपूर्णनागपूर : बेघर व गरिबांना निवारा मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून इंदिरा आवास योजना राबविली जाते. परंतु दिलेले उद्दिष्ट वर्षानुवर्षे पूर्ण होत नाही. अपेक्षित गरजूंना लाभ मिळत नसल्याने या योजनेची उद्दिष्टपूर्ती केव्हा होणार, असा प्रश्न लाभार्थींना पडला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून ही योजना राबविली जाते. नियामक मंडळाच्या बैठकीत घरकूल योजनांचा आढावा घेतला जातो. परंतु निर्देशानंतरही घरकूलांची कामे वेळेत पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. २०१२-१३ या वर्षात जिल्ह्याला ४५८२ घरकूलांचे उद्दिष्ट दिले होते. यासाठी शासनाने ३०२२.५५ लाखांचा निधी उपलब्ध केला होता. परंतु २०१३-१४ वर्षाअखेर ३१४ घरकूलांचे काम अपूर्ण होते. तर २०१३-१४ या वर्षात २४६७ घरकूलांसाठी २३४३.६५ लाखांचा निधी मंजूर असूनही ६४८ घरकूलांची कामे अद्याप अपूर्ण आहे. १० जानेवारी २०१४ च्या नियामक मंडळाच्या बैठकीत घरकूलांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. परंतु सहा महिन्यानंतरही तीच परिस्थिती कायम आहे. दिलेले उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याने निधी अखर्चित राहतो. दुसरीकडे पुढील वर्षासाठी उद्दिष्टही कमी दिले जाते. यामुळे बेघर लोकांना निवारा मिळत नाही. मागील दोन वर्षात ९६२ घरकूलांची कामे अपूर्ण आहे. २०१४-१५ या वर्षाासाठी पुन्हा २२५८ घरकूलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. घरकूलांची कामे ठराविक कालावधीत पूर्ण झाली असती तर उद्दिष्टात वाढ झाली असती. (प्रतिनिधी)
इंदिरा आवासची उद्दिष्टपूर्ती केव्हा ?
By admin | Published: July 27, 2014 1:16 AM