शरद मिरे
भिवापूर: भिवापूर शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला हे खरे असले तरी धावत्या विकास रथाचा आणि कामांचा दर्जा मात्र घसरला. गत पाच वर्षांत सत्ताधारी नगरसेवकांत केवळ भांडणे भडकली. त्यामुळे शहरातील समस्यांना केराची टोपली मिळाली. कार्यकाळ संपल्यामुळे गत वर्षभरापासून नगरपंचायतीवर प्रशासक आहे. अशात आवश्यक निर्णय घेताना अधिकाऱ्यांनाही अडचणी येत आहे. त्यामुळे निवडणुकीचा शंखनाद होणार कधी, असा सूर आवळला जात आहे.
१७ सदस्यीय संख्या असलेल्या भिवापूर न.प.च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसचे ५, बसपा (३), भाजपा (३), शिवसेना (४) तर दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. त्यावेळी काँग्रेस-शिवसेनेने एकत्र येत सत्ता स्थापना केली होती. मात्र त्यांचा संसार केवळ अडीच वर्षच टिकला. या अडीच वर्षात विकासात्मक चर्चांना वेळच मिळाला नाही. कारण आरूढ नगरसेवक केवळ एकमेकांचे उणेदुणे काढण्यात व्यस्त होते. त्यानंतर पुढील अडीच वर्षासाठी काँग्रेस-बसपा या दोन पक्षांनी एकत्रित येत संसार थाटला.
सत्ताधाऱ्यांतील ही गटबाजी शहराच्या विकासाला ग्रहण ठरली. कार्यकाळ पूर्ण झाल्याने नगरसेवकांना खूर्च्या खाली कराव्या लागल्यात. नगरपंचायत आता प्रशासकाच्या माध्यमातून शहराचा कारभार सांभाळत आहे. मात्र प्रशासकांच्या कारभाराला काही मर्यादा असल्याने शहराच्या विकासात अधिकाऱ्यांनाही अडचणी येत आहे. त्यात मुख्याधिकाऱ्यांकडे इतर ठिकाणचा कार्यभार असल्याने सध्या शहराचा कारभार रामभरोसे सुरू आहे. त्यामुळे वेळीच निवडणूका होऊन शहराच्या खूंटलेल्या विकासाला आता बुस्टर डोजची आवश्यक आहे. निवडणूक लढण्यासाठी इच्छूक असलेल्या काही हवशा नवशांनी आपल्या वॉर्डात जनसंपर्क अभियान सुरु केले आहे.
काँग्रेसमध्ये इच्छुक अधिक
निवडणूकीत उमेदवारी मिळविण्यासाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी आहे. यात गटबाजी सुध्दा तेवढीच आहे. अशा स्थितीत आ.राजू पारवे होम टाऊनमध्ये कोणता चमत्कार दाखवितात याकडे सुध्दा सर्वांचे लक्ष लागले आहे.
---
भाजपपुढे आव्हान
राज्यात भाजपाची सत्ता नाही. क्षेत्रात आमदार नाही. अशा परिस्थीती निवडणूकीच्या मैदानात भाजपा पुढे मोठे आवाहन आहे. गतवेळी भाजपचे केवळ तिनच नगरसेवक निवडून आले होते. शहराच्या विकास कामासाठी सत्ताधाऱ्यावर दबाव टाकण्यात विरोधी पक्ष म्हणून भाजपा नगरसेवक कमी पडले.
सेनेचा वाघ डरकाळी फोडणार?
पहिल्याच निवडणूकीत शिवसेनेने ४ नगरेसवक निवडूण आणत काँग्रेससोबत संसार थाटला. मात्र सेनेला उपाध्यक्ष व सभापती पद वगळता मान-सन्मान मिळाला नाही. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी असली तरी नगरपंचायत निवडणूक मात्र स्वबळावर लढण्याची तयारी सेनेने केली आहे.
बसपाला नव्या चेहऱ्यांची आवश्कता
हत्तीवर स्वार होऊन बसपाचे तीन नगरसेवक पहिल्यांदाच निवडूण आलेत. मात्र या तिन पैकी दोन नगरसेवकांची कारकिर्द वादात राहीली. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत बसपाला नव्या चेहऱ्यांनाच संधी द्यावी लागणार आहे. शहरातील तीन प्रभागात बसपाचा प्रभाव आहे.
राष्ट्रवादीची भूमिका काय ?
शहरात राष्ट्रवादीचे संघटन कमकूवत असले तरी उमरेड येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी काँग्रेसला अर्लट करणारी आहे. काँग्रेसकडून सापत्न वागणूक मिळत असल्याच्या कारणावरून राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते नाराज आहे. त्यामुळे त्यांनीही स्वतंत्र लढण्याची तयारी चालविली आहे.
080921\img_20160528_153931.jpg
नगरपंचायत भिवापूर