लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दृष्टिहिन विद्यार्थी अन् ‘आॅनलाईन’ परीक्षा. हे समीकरण ऐकूनच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. तसे तर दृष्टिहीनांसाठी आॅनलाईन परीक्षा म्हणजे दिवास्वप्नच असल्याचा समज आहे. मात्र नागपुरात सोमवारी खरोखरच दृष्टिहिन विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या ज्ञानचक्षूंच्या मदतीने चक्क ‘आॅनलाईन’ परीक्षा दिली आणि समाजाच्या विचारांच्या चौकटीला छेदच दिला.‘सबकुछ आॅनलाईन’च्या जमान्यात दृष्टिहिनांनादेखील तंत्रज्ञानाने ज्ञानचक्षू उपलब्ध करुन दिले आहेत. दृष्टिहिन विद्यार्थ्यांना आता संगणक, मोबाईल वापरणे सुलभ होत आहे. केंद्र सरकारचा विज्ञान प्रचार-प्रसार विभाग आणि विज्ञान भारतीतर्फे राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी विज्ञान मंथन ही परीक्षा घेण्यात येते. यावर्षी पहिल्यांदाच दिव्यांगांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. यात नागपूरच्या अंध विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी ही आॅनलाईन परीक्षा दिली.जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातून केवळ तीन विद्यार्थी प्रविष्ट झाले. विशेष म्हणजे हे तीनही विद्यार्थी नागपुरातीलच होते. ‘दि ब्लार्इंड रिलिफ असोसिएशन’तर्फे संचालित अंध विद्यालयातील नवव्या वर्गातील पूनम ठाकरे, आदित्य पाटील व हिमांशु बोकडे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. शिक्षकांनी परीक्षेसाठी या विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज केले होते. आयोजकांकडून विद्यार्थ्यांचे ‘यूझर आयडी’ आणि ‘पासवर्ड’ प्राप्त झाले. सोमवारी दुपारी ३ वाजता ‘अॅप बेस डिजिटल’ परीक्षेला सुरुवात झाली. या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम संस्थेचे सहसचिव मकरंद पांढरीपांडे यांनी ‘ब्रेल’ व ‘आॅडिओ’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुरविले. विद्यार्थ्यांनी पुरविलेल्या साहित्यातून अभ्यास करून ‘आॅनलाईन’ परीक्षा दिली. ही परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थी विज्ञान मंडळाचे राज्यस्तरीय समन्वयक डॉ. उमेश पालेकुंडवार उपस्थित होते. सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा अर्धातास अधिक वेळ या विद्यार्थ्यांना देण्यात आला.यापूर्वी सात विद्यार्थ्यांनी दिली ‘एमएचसीआयटी’डिजिटल तंत्रज्ञानाशी अंध विद्यार्थ्यांना सुसंगत करण्याचा प्रयत्न वेळोवेळी अंध विद्यालयाकडून करण्यात येतो. यापूर्वी विद्यालयाने त्यांच्या शाळेतील सात विद्यार्थ्यांना ‘आॅनलाईन एमएचसीआयटी’ परीक्षेला प्रविष्ट केले होते. हे सुद्धा महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडले होते. यातील एक विद्यार्थी आज इंडियन बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे मकरंद पांढरीपांडे यांनी सांगितले.