सुमेध वाघमारे
नागपूर - शासकीय रुग्णालयात आठवड्यात एक ते दोन बेवारस मृतदेह येतात, मात्र अशा मृतदेहावर रासायनिक प्रक्रिया करून हाडांचा सापळा काढण्याची तरतूदच नाही. मानवी हाडेच उपलब्ध होत नसल्याने अभ्यास कसा करावा, या अडचणीत वैद्यकीय विद्यार्थी सापडले आहेत. विशेष म्हणजे मेयो व मेडिकलच्या विद्यार्थ्याना शिक्षणासाठी दरवर्षी जवळपास २२५ मानवी सापळ्यांची गरज भासते, परंतु ५० ही उपलब्ध होत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला प्रथम वर्षात सर्वसाधारण शरीररचना शास्त्र (अॅनाटॉमी) हा विषय शिकविला जातो. त्यामध्ये मानवी शरीराचा अभ्यास केला जातो. देहदानाच्या जनजागृतीमुळे बऱ्या प्रमाणात मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयाला मिळतात. मृतदेहावर रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर त्याचा शैक्षणिक कार्यक्रमासाठी (डिसेक्शन) वापर होतो. डिसेक्शनानंतर अवयवातून हाडे काढणे शक्य आहे. मात्र या प्रक्रियेद्वारे प्राप्त झालेले हाडांचे सापळे तेलकट असतात. विद्यार्थ्यांना हाताळण्यासाठी अडचणीचे जाते. तसेच रसायने वापरल्यामुळे हाडाची झीजही होते. बेवारस मृतदेहावर नैसर्गिकरीत्या प्रक्रिया करून काढलेले सापळे चांगल्या प्रतीचे असतात. विद्यार्थ्यांना हाताळण्यासाठी ते सोयीचे ठरते. प्रदीर्घ काळासाठी टिकविणेही सहज शक्य होते, मात्र तसे होताना दिसून येत नाही.
हाडांचा सापळा मिळण्याची कार्यप्रणालीच नाही
नागपुरात मेयो व मेडिकलमधून साधारण ४५० विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. सर्वसाधारण दोन विद्यार्थी मिळून एक हाडाचा सापळा जरी आवश्यक धरला तरी प्रत्येक वर्षाला २२५ हाडांचा सापळ्याची आवश्यक्ता भासते, परंतु हाडांचा सापळा मिळण्याची कार्यप्रणालीच नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणावर परिणाम होतो. हाडांचा सापळा मिळविण्यासाठी कायदेशीर मार्गने कार्यप्रणाली ठरविणे आवश्यक आहे.
बेस्ट ऑफ बायोवेस्ट
बेवारस व सडलेले मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता वापरणे शक्य होत नाही. अशा मृतदेहाला टाकावू समजण्यात येते. परंतु अशा मृतदेहावर ‘मॅसीरेशन’ प्रक्रिया करुन हाडांचा सापळा तयार करणे शक्य आहे. असे झाल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण व संशोधन करण्यास संधी मिळेल. ‘बेस्ट आऊट ऑफ बायोवेस्ट’, असे म्हणणे संयुक्तिक होईल.
महाविद्यालयात मानवी हाडे उपलब्ध
मेडिकलच्या एका वरिष्ठ डॉक्टरांनुसार, ‘नॅशनल मेडिकल कमिशन’नुसार महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी २५ सापळ्यांची गरज असते. आपल्याकडे ५० सापळे आहेत. शिवाय भरपूर प्रमाणात मानवी हाडे आहेत. परंतु ती महाविद्यालयाबाहेर विद्यार्थ्यांना दिली जात नाही. वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्या वैयक्तिकस्तरावर अभ्यासासाठी मानवी हाडे मिळणे आवश्यक आहे. ‘आर्टिफिशियल’ हाडांच्या मदतीने अभ्यास करणे अडचणीचे जाते.
शिक्षणासाठी हाडांचे सापळे महत्वाचे
वैद्यकीय शिक्षण चांगल्याप्रकारे समजण्याकरिता ‘ब्रेन’, ‘बुक’, ‘बोनसेट’ या तीन गोष्टींची आवश्यक्ता असते. यापैकी ‘ब्रेन’ व ‘बुक’ वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांजवळ असते, परंतु ‘बोनसेट’ (हाडांचा सापळा) फार कमी वैद्यकीय विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असतात. वरिष्ठ विद्यार्थी, नातेवाईक, मित्रमंडळी याच्याकडून ते मिळवतात. बेवारस मृतदेहामधून हाडांचे सापळे काढण्याची कायद्यात तरतूद झाल्यास वैद्यकीय विद्यार्थ्यांना याची मदत होऊन उत्तम डॉक्टर तयार होतील.
-डॉ. सजल बन्सल, अध्यक्ष निवासी डॉक्टर संघटना ‘मार्ड’