काटोल : राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने पोलीस खात्यांतर्गत फौजदार भरती प्रक्रिया राबविल्या जाते. गत तीन वर्षापासून ही प्रक्रिया प्रलंबित असल्याने कॉन्स्टेबल ते फौजदार बनू पाहणाऱ्या तरुण पोलिसांचे स्वप्न भंग होण्याच्या मार्गावर आहे. शासनाच्या वतीने लवकर खात्यांतर्गत फौजदार भरती करावी, अशी मागणी फौजदार पदाकरिता अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत असलेल्या तरुण कॉन्स्टेबल युवकांच्या वतीने केली जात आहे.
राज्य पोलीस दलात फौजदार पदाकरिता ५० टक्के रिक्त पद भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या माध्यमातून केली जाते. २५ टक्के फौजदार खात्यांतर्गत सेवेत असलेल्या पदोन्नती मार्गाने भरली जातात. उर्वरित २५ टक्के पदभरती ही खात्यांतर्गत उमेदवारांची स्पर्धा परीक्षा घेऊन केली जाते. मात्र २०१६ नंतर खात्यांतर्गत फौजदार पदाची जाहिरातच आलेली नाही. त्यामुळे पोलीस खात्यात काम करून फौजदारपदाच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुण पोलिसांचा मात्र भ्रमनिरास होतो आहे.
ग्रामीण भागातील असंख्य तरुण परिस्थितीशी दोनहात करीत शिक्षण घेतात. त्यांची त्यावेळी स्वप्न जरी मोठी असली तरी कुटुंबाला आधार म्हणून स्वप्नाशी तडजोड करून तो सरकारी खात्यात लहान पदाची नोकरी स्वीकारतो. खात्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ते पूर्ण करण्याच्या प्रयत्न करतो. अशी अपेक्षा बाळगणारे तरुण पोलीस खात्यात जास्त आहेत. त्यामुळे शासनाने पोलीस खात्यांतर्गत घेतली जाणारी फौजदारी पदाची जाहिरात त्वरित प्रकाशित करावी, अशी मागणी केली जात आहे.
अनेकांसमोर वयाची अडचण
खात्यांतर्गत घेतल्या जाणाऱ्या या भरतीकरिता ठराविक वयाची अट घालण्यात आलेली आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यास करणाऱ्याचे वय वाढत असल्याने जाहिरात प्रसिद्ध झाली तरी अनेकांची फौजदार होण्याची संधीही निश्चितच हुकणार आहे.