लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले म्हणून एका सुस्वरूप आणि हुशार विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे वसाहतीत शुक्रवारी ही घटना घडली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सीतालक्ष्मी शहाजी नायर वय 18 असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून तिने नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. तिला ७३ टक्के गुण मिळाले होते. सीतालक्ष्मी हिला डॉक्टर व्हायचे होते. ती हुशार होती आणि सुस्वरूपही होती. त्यामुळे बारावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर संबंधित पूर्वअभ्यासक्रमासाठी तिने अर्ज केला. त्यासाठी तिची चाचणी परीक्षा झाली. त्यात ती अनुत्तीर्ण झाली. आपल्याला डॉक्टर बनता येणार नाही, या कल्पनेने अस्वस्थ झालेली सीतालक्ष्मी तीन दिवसांपासून नैराश्याच्या गर्तेत गेली.
सीतालक्ष्मीला आई-वडील आणि एक भाऊ आहे. वडील रेल्वेचालक म्हणून सेवारत आहेत. घरची स्थिती चांगली आहे. घरच्यांनी तिला दिलासा देऊन तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या मनात भलतेच वादळ उठले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी ६.३० च्या सुमारास तिने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर घरच्यांनी तिला लगेच मेडिकलमध्ये नेले. मात्र डॉक्टरांनी सीतालक्ष्मीला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.