लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘उठ रे माझ्या बाळा...’असे म्हणत सकाळी नागपूर रेल्वेस्थानकावर एका मातेने आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली अन् हंबरडा फोडला. हा प्रसंग पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली.जबलपूर येथील रहिवासी राजू हा १५ वर्षाचा युवक मागील काही दिवसांपासून आजारी होता. बुधवारी सकाळी त्याची आई आणि मामासोबत तो उपचारासाठी जबलपूर-नागपूर एक्स्प्रेसने नागपुरात आला. सकाळी ७ वाजता ते नागपूर रेल्वेस्थानकावर उतरले. जनरल कोचमधून उतरल्यानंतर प्लॅटफार्म क्रमांक २ वर एस्क्लेटरवरून जात असताना राजूचा तोल गेला. आजारपणामुळे तो खूप अशक्त झाला होता. तो खाली पडणार एवढ्यात एका प्रवाशाने त्यास सावरले आणि फूट ओव्हरब्रीजवर आणले. तेथे एक प्रवासी व्हील चेअर घेऊन जात होता. त्या चेअरवर राजूला बसवून रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणण्यात आले. तो पर्यंत राजू बेशुद्ध झाला होता. तो काहीच हालचाल करत नव्हता. खूप प्रयत्न करूनही राजूने प्रतिसाद दिला नाही. हे पाहून त्याच्या आईने ‘उठ रे माझ्या बाळा’ म्हणत त्याला घट्ट मिठी मारली आणि हंबरडा फोडला. अखेर राजूच्या मामाने रुग्णवाहिका बोलावली आणि ते त्याला परत घरी घेऊन गेले. उपचारासाठी नागपुरात आणलेल्या मुलावर उपचार करण्याची संधीही या मातेला मिळाली नसल्याचे पाहून तेथे उपस्थित अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
मुलाने अखेरचा श्वास घेताच आईने फोडला हंबरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 1:26 AM
‘उठ रे माझ्या बाळा...’असे म्हणत सकाळी नागपूर रेल्वेस्थानकावर एका मातेने आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली अन् हंबरडा फोडला. हा प्रसंग पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
ठळक मुद्देरेल्वेस्थानकावरील हृदयद्रावक घटना : उपचारासाठी आणलेल्या मुलाचा मृत्यू