लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दहशतवादी हल्ल्याची बातमी नियंत्रण कक्षातून मिळाली आणि पोलीस दलात खळबळ उडाली. क्यूआरटीचे कमांडो रामगिरीत धडकले. आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला. तब्बल दीड तास चकमक चालली आणि कमांडोजनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले तर दुसऱ्याला अटक केली.
नागपुरातील सुरक्षा व्यवस्था कशी आहे, हे तपासण्यासाठी दहशतवादी हल्ल्याची मॉकड्रील आज सायंकाळी घेण्यात आली. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास नियंत्रण कक्षातून पोलीस दलाला एक माहिती मिळाली. मुख्यमंत्री निवासस्थान रामगिरी येथे दोन दहशतवादी शिरले असून, त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना ओलिस ठेवल्याचे सांगितले गेले. ते कळताच शीघ्र कृती दलाची दोन पथके रामगिरीला पोहचली. तीन अधिकारी आणि २४ कमांडोंचा सहभाग असलेल्या या पथकाने दहशतवाद्यांचा मुकाबला करून एकाला कंठस्नान घातले तर दुसऱ्याच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्या ताब्यातून रामगिरीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची सुटका केली. दरम्यान, मॉकड्रील सुरू असताना रामगिरीच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर पोलिसांनी सील केला होता. मोठ्या प्रमाणात सशस्त्र पोलिसांचा ताफा पाहून काही तरी अघटित घडल्याचा संशय नागरिकांना आला. त्यामुळे अल्पावधीतच आजूबाजूला बघ्यांची प्रचंड गर्दी जमली. मॉकड्रीलचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक खरात, केदारी आणि जाधव यांनी केले.
----
तपासणी, चाचपणी
ऐनवेळी दहशतवादी हल्ला झाल्यास कसा मुकाबला करायचा, याची वेळोवेळी पोलीस दलाकडून रिहर्सल केली जाते. दहशतवाद्यांचा हल्ला कसा परतवून लावायचा, त्यांच्याशी कसे लढायचे, त्यांना कसे जेरबंद करायचे, यासंबंधाचे निर्देश कमांडोजना स्थानिक वरिष्ठ देत असतात. दोन महिन्यापूर्वी खापरीतील एचपीसीएल डेपोमध्येही अशाच प्रकारची मॉकड्रील करण्यात आली होती.
----