रामटेक : ३५० फुटाच्या बोअरवेलच्या खड्ड्यात एखादा बालक पडला आणि तो वाचला हे सांगितल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतील! मात्र रामटेकपासून २० कि.मी. अंतरावरील शिवनी (भोंडकी) या गावात बुधवारी (दि. ९) दुपारी ४ वाजताच्या सुमारास हे घडलय. खड्ड्यात २० फुटावर अडकलेल्या नवधान देना दोंडा या मुलाला गावकऱ्यांनी सुखरूप बाहेरही काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवनी (भोंडकी) येथील एका शेतात काठयावाडींनी डेरा टाकला आहे. या शेतात जवळपास ३५० फुटांची एक बोअरवेल आहे. पण पाणी न लागल्याने ती तशीच ठेवण्यात आली. तीन वर्षीय नवधान देना दोंडा हा इतर मुलांसोबत तिथे खेळत होता. खेळता खेळता तो बोअरवेलच्या खड्ड्यात पडला. तिथे उपस्थित त्याचे आई-वडील व इतर नातेवाईक धावले. गावातही ही बातमी वाऱ्यासारखी पोहोचली. ग्राम रक्षक दलाचे कृष्णा पाटील, यादोराव शेंडे, शंकर शेंडे, अक्षय गभणे घटनास्थळी दाखल झाले. मुलांच्या नातेवाईकांनी बाहेरून त्याला आवाज दिला. यानंतर आत एक दोर सोडण्यात आला. बोअरवेलमध्ये पडला असताना मुलाच्या पायात शूज होते. तो थोडा लठ्ठ असल्याने खड्ड्यात २० फुटावर अडकला. त्यांच्या भाषेत आई-वडिलांनी त्याला आवाज दिला, त्यानेही प्रतिसाद दिला. त्याने सोडलेला दोर घट्ट पकडला. त्यानंतर त्याला हळूहळू वर ओढण्यात आले. नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला. बाहेर आल्यावर त्याला पाणी पाजण्यात आले. सुदैवाने त्याला कोणतीही जखम झाली नसल्याने उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.