वानाडोंगरी : हिंगणा तालुक्यातील सावळी बीबी ग्रामपंचायत हद्दीत स्वस्त धान्य दुकानासाठी माँ सरस्वती महिला बचत गट आणि जय किसान शेतकरी बचत गट असे दोन अर्ज पुरवठा विभागाला प्राप्त झाले होते. दुकान वाटपात वाद निर्माण झाल्याने यावर तोडगा काढण्यासाठी हिंगण्याच्या तहसीलदारांनी पुरवठा विभागाला महिला ग्रामसभेचा पर्याय सुचविला. शासकीय नियमानुसार स्वस्त धान्य दुकान वितरित करताना महिला ग्रामसभेची बहुमत ज्या व्यक्तीला किंवा गटाला असेल त्याला ते दुकान दिल्या जाते. अशीच परिस्थिती सावळी ग्रामपंचायत येथे निर्माण झाली होती. तहसीलदारांच्या आदेशानंतर या ठिकाणी महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. तीत मोठ्या संख्येने गावातील महिला उपस्थित राहिल्या. ग्रामसभेत हात वरती करून समर्थन या पर्यायाला विरोध झाल्यामुळे येथे मतदान घेण्यात आले. त्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. या निवडणुकीत एकूण ४५५ मतदारांनी हक्क बजाविला. तीत ३९४ मते ही माँ सरस्वती महिला बचत गट तर ४३ मते जय किसान शेतकरी बचत गटाला मिळाली. १८ मते अवैध ठरली. आशा प्रकारे माँ सरस्वती महिला बचत गटाला बहुमताने समर्थन मिळाले. निवडणुकीचे आयोजन ग्रामपंचायत मार्फत सचिव राजेंद्र मुरले, तालुका पुरवठा निरीक्षक मनोज लटारे, सतीश बन्सोड यांनी पार पाडले.
----
तहसीलदार संतोष खांडरे यांच्या आदेशानुसार २२ डिसेंबरला महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. याची माहिती १५ डिसेंबरला सावळी बीबी ग्रामपंचायतला देण्यात आली. ग्रामसभेत गावातील महिलांच्या मागणीनुसार मतदान घेण्यात आले.
राजेंद्र मुरले, सचिव ग्रामपंचायत सावळी बीबी