नागपूर विद्यापीठ : व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झाली चर्चानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०० वा दीक्षांत समारंभ यशस्वीपणे पार पडला. परंतु हा समारंभ सुमारे वर्षभर लांबल्यामुळे १०१ वा दीक्षांत समारंभदेखील लांबणीवर पडला. या दीक्षांत समारंभासाठी मुहूर्त कधी निघणार यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मंगळवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या तातडीच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला होता. जानेवारी २०१५ मध्ये हा दीक्षांत सोहळा आयोजित करावा यावर सदस्यांनी सकारात्मकता दर्शवली. परंतु यावर ठोस निर्णय होऊ शकला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.व्यवस्थापन परिषदेच्या तातडीच्या बैठकीदरम्यान विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.के.सी.देशमुख यांनी यासंदर्भात प्रस्ताव मांडला. १०० वा दीक्षांत समारंभ तर झाला परंतु आता १०१ वा दीक्षांत समारंभ लवकरात लवकर घेणे आवश्यक आहे. अन्यथा विद्यार्थ्यांना याचा फटका पडू शकतो, असे मत त्यांनी यावेळी मांडले. या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान सर्वांनीच त्याचे समर्थन केले. जानेवारी २०१५ मध्ये हा दीक्षांत समारंभ घेण्यात यावा, असा विचारदेखील सदस्यांनी बोलून दाखविला. परंतु यावर ठोस निर्णय होऊ शकला नाही. व्यवस्थापन परिषदेच्या पुढील बैठकीत यावर निर्णय होऊन तारखेवरदेखील शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)
१०१ वा दीक्षांत समारंभ कधी?
By admin | Published: October 23, 2014 12:31 AM